रमजानच्या महिन्यातही पाकिस्तान आपले अवगुण दाखवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बीएसएफच्या हल्ल्याला घाबरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय सीमारेषेवर गोळीबार करण्यास सुरूवात केली आहे. जम्मू-काश्मीरच्या विविध भागात पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या गोळीबारामुळे ४ लोकांचा मृत्यू तर २० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारामुळे सीमावर्ती भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे ४० हजार लोकांना सरकारी शिबिरांमध्ये स्थलांतर करावे लागले आहे. दरम्यान, भारतीय जवानांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या गोळीबारात एका ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेसहित दोन जण जखमी झाले होते. सीमेनजीकची स्थिती पाहून गावातील लोकांना सरकारी शिबिरात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या गोळीबारामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानकडून अखनूर ते सांबापर्यंतच्या सर्वच ठिकाणी गोळीबार केला जात आहे. जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एस डी सिंग जमवाल यांनी अरनिया सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले. आता दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे.

मंगळवारी पाकिस्तानच्या गोळीबारात अरनिया सेक्टरमधील पिंडी गावातील रहिवासी मदनलाल भगत यांच्या घरावरील छप्पर उडून गेले होते. गोळीबार होत असलेल्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे जमवाल यांनी सांगितले. जम्मूचे विभागीय आयुक्त हेमंतकुमार शर्मा म्हणाले की, आरएस पुरा येथे सुरक्षित ठिकाणी मदत शिबीर सुरू करण्यात आले आहेत. अरनिया सेक्टरमध्ये मदत शिबीर सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या शिबिरांमध्ये शेकडो लोकांनी आसरा घेतला आहे.