देशातील करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या पाहाता देशाच्या आरोग्य मंत्रालयाने एक पहाणी करुन माहिती गोळा केली आहे. या पहाणीनुसार देशातील ८४ हजार नागरिकांमध्ये केवळ एक विलगीकरण (आयसोलेशन) बेड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याचे स्पष्ट झालं आहे. तसेच अलगीकरण (क्वारंटाइन) करण्यासाठी दर ३६ हजार भारतीयांमध्ये केवळ एक बेड असल्याची माहिती समोर आली आहे. देशामध्ये करोनाचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पहाणीमध्ये दर ११ हजार ६०० भारतीयांसाठी देशात एक डॉक्टर असे प्रमाण असल्याचेही या पहाणीमधून समोर आलं आहे. तर देशातील रुग्णालयांमधील बेडच्या संख्येबद्दल सांगायचे झाल्यास दर एक हजार ८२६ नागरिकांमागे रुग्णालयामध्ये केवळ एक बेड उपलब्ध असल्याचे या पहाणीत दिसून आलं आहे.

याच माहितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केलं असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण कमी व्हावा, करोनाचा प्रसार थांबावा आणि करोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्याला लगाम लावण्यासाठी मोदींनी जनतेला घराबाहेर न पडण्याचं आवाहन केल्याचे समजते.

इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (आयसीएमआर) संचालक अनुराग अग्रवाल यांनी यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. “आपण करोना संर्सगाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. या टप्प्यामध्ये सोशल डिस्टन्सींग खूप महत्वाचे असते. तिसऱ्या टप्प्यावर लॉकडाऊन गरजेचे ठरते. पहाणीमधील माहितीमुळे या पुढील सर्व निर्णय सराकर का घेत आहे हे स्पष्ट होत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून सोशल डिस्टन्सींग करणे खूप गरजेचे आहे. भविष्याचा विचार करता जनता कर्फ्यू हा चांगला उपक्रम आहे. सध्याची आकडेवारी पाहता सरकार योग्य मार्गावर आहे असंच म्हणता येईल,” असं मत अग्रवाल यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- Coronavirus: भारतात होणार करोनावर संशोधन आणि औषधांची चाचणी

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फर्न्सींगद्वारे अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामध्ये आयसीएमआरचे डॉक्टर बलराम भार्गव यांनी देश सध्या करोना संक्रमण होण्याच्या दुसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगितलं. तिसऱ्या टप्प्यात कमी संक्रमण व्हावे यासाठी निर्णय तातडीने घ्यावे लागतील असंही डॉ. भार्गव यांनी स्पष्ट केलं. देशातील राष्ट्रीय आरोग्य महिती संकलन २०१९ च्या आकडेवारीनुसार देशात ११ लाख ५४ हजार नोंदणीकृत अलोपॅथिक डॉक्टर्स आहेत. तर देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये सात लाख ३९ हजार २४ बेड आहेत. देशातील १३५ कोटी जनतेसाठी हे अपुरे आहेत. अद्याप करोनावरील नियंत्रण उपाययोजनांमध्ये खासगी रुग्णालयांचा विचार करण्यात आलेला नाही.