05 April 2020

News Flash

करोनाचा कहर : ८० कोटी गरिबांना आधार

करोना आपत्तीसाठी केंद्राची एक लाख ७० हजार कोटींची योजना

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणू संकटाचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या गरिबांना बसणार असल्याने त्यांना तातडीने आणि थेट आर्थिक मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने गुरुवारी केली. त्यासाठी एक लाख ७० हजार कोटी रुपयांची ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ जाहीर करण्यात आली.

* देशातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही’, याची हमी या योजनेद्वारे देण्यात आली आहे. पुढील तीन महिने ८० कोटी गरिबांना प्रत्येकी सहा किलो धान्य मोफत पुरवले जाईल. त्याशिवाय, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी शेतकरी, मजूर, ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग इत्यादींसाठी किमान रोख रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. देशभर बंदी लागू झाल्यानंतर ३६ तासांत समाजातील विविध गरजू घटकांसाठी केंद्र सरकारने मदतनिधी दिला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

मोफत धान्य

* ८० कोटी गरिबांना प्रत्येकी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू आणि एक किलो डाळ असे सहा किलो धान्य पुढील तीन महिन्यांसाठी मोफत मिळेल. हे धान्य दोन हप्त्यांमध्ये घेता येईल.

* अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत दरमहा दोन आणि तीन रुपये दराने प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते. आपत्ती काळातील मोफत धान्य हे नियमित मिळणाऱ्या पाच किलो धान्यांच्या व्यतिरिक्त असेल. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांवर गरिबांना तीन महिन्यांसाठी ११ किलो धान्य मिळणार आहे.

महिलांना मदत

* जनधन खाते असलेल्या २० कोटी गरीब महिलांच्या खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये

* ६३ लाख महिला बचत गटांना २० लाखांपर्यंत विनातारण कर्ज, त्याचा लाभ ७ कोटी कुटुंबांना

* उज्ज्वला योजने अतंर्गत ८.३ कोटी कुटुंबांना तीन महिने घरगुती गॅस सिलिंडर मोफत

शेतकऱ्यांना २ हजार रुपये

* शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत तातडीने दोन हजार रुपये

* पहिला हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात थेट बँक खात्यात

* ८.६९ कोटी शेतकऱ्यांना लाभ

* या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात

* ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना दोन हप्त्यांत एक हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

रक्षणकर्त्यांसाठी ५० लाखांचे विमाकवच

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि लोकांना सेवा पुरवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या प्रत्येकाला  ५० लाखांचे विमा संरक्षण पुरवले जाणार आहे. त्यात, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे.

मजुरीत वाढ

‘मनरेगा’ची मजुरी १८२ रुपयांवरून २०२ रुपये केली जाईल. २ हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मजुरांना मिळेल. ५ कोटी कुटुंबांना लाभ होईल. बांधकाम क्षेत्रातील ३.५ कोटी नोंदणीकृत कामगारांसाठी ३१ हजार कोटींचा कोषनिधी वापरण्याचा राज्यांना आदेश.

राज्यात सहावा बळी

राज्यात करोनाने आतापर्यंत सहा बळी घेतले आहेत. मुंबईतील दोन महिलांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. राज्यात या विषाणूच्या रुग्णांची संख्या गुरुवारी १२६ वर पोहोचली. सिंधुदुर्गमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे.

देशातील रुग्णसंख्या ६६०

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या गुरुवारी ६६० वर पोहोचली, असे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. देशात एका दिवसात करोनाच्या जवळपास पन्नास रुग्णांची भर पडली.  केरळमध्ये गुरुवारी १९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे केरळमधील रुग्णसंख्या १३७ वर पोहोचली.

जगभरात २२ हजार मृत्युमुखी 

जगभरात करोनाचे थैमान सुरूच असून, या विषाणूने आतापर्यंत २२,१५६ बळी घेतले आहेत. या विषाणूने  इटलीमध्ये  रुग्णसंख्या पाऊण लाखावर पोहोचली आहे. स्पेनमध्येही मृतांचा आकडा चार हजारांहून अधिक झाला आहे.

राज्यात आणखी ८ प्रयोगशाळांत तपासणी

मुंबई : देशभरात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात असून ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे  गुरूवारी निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी आठ प्रयोगशाळा किंवा लॅब या महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:18 am

Web Title: one lakh 70 thousand crores plan for the corona disaster abn 97
Next Stories
1 करोनाचा कहर : जगभरात २१ हजारांहून अधिक बळी
2 विषाणू रोखण्यासाठी सरकारला पाठिंबा!
3 करोनाच्या मुद्दय़ावरून ‘डब्ल्यूएचओ’ चीनच्या बाजूने
Just Now!
X