भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या शुक्रवारी एक लाखांवर पोहोचली. जगभरात आतापर्यंत करोनामुळे १० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १० टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. भारताच्या तुलनेत फक्त अमेरिका आणि ब्राझिलमध्ये सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. अमेरिकेत २ लाख १२ हजार तर ब्राझिलमध्ये १ लाख ४५ हजार जणांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.

करोनामुळे जगभरात दिवसाला चार ते सहा हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. दुसरीकडे भारतात गेल्या एका महिन्यापासून दिवसाला जवळपास एक हजार रुग्ण आढळत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून भारतातील मृत्यूदर कमी होताना दिसत आहे. भारतात करोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण १.५६ टक्के इतकं झालं आहे.

दरम्यान भारतातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३८ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील जास्त असून २.६७ टक्के इतका आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी नऊ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत तेथील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी पाच हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

सर्वाधिक मृत्यूदर पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये रुग्णसंख्या १ लाख १५ हजार असून ३५०० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यू दर सध्या तीन टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्यात पंजाबमध्ये दोन हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यावेळी रुग्णसंख्या ६० हजार इतकी होती. मृत्यू रोखण्यात केरळ, बिहार, आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. येथील मृत्यूदर सर्वात कमी आहे.