युरोपीय महासंघाने भविष्यवेधी तंत्रज्ञानासाठी एक स्पर्धा घेतली होती; त्यात मानवी मेंदू संशोधन प्रकल्पाची निवड झाली असून आता या प्रकल्पाला मोठय़ा प्रमाणात अर्थसाह्य़ मिळणार आहे. मेंदूच्या संशोधनासाठी एक अब्ज युरो इतकी मदत यात दिली जाणार आहे. त्यात दहा वर्षे माहिती संकलित करून महासंगणकावर प्रारूपे बनवून मानवी मेंदूचे संशोधन केले जाणार आहे.

मानवी मेंदूची नक्कल
मानवी मेंदू प्रकल्पात पेशी, मेंदूतील रसायने व न्यूरॉन्सची जोडणी यांची नक्कल महासंगणकात केली जाणार असून त्याच्या मदतीने मेंदूचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येणार आहे. मेंदू हा माणसाच्या शरीरातील अतिशय गुंतागुंतीचा अवयव आहे. त्यात अब्जावधी न्यूरॉन्स एकमेकांना जोडलेले असतात. आपल्याला सध्या मेंदूची जी माहिती आहे त्याची संगणक प्रारूपे करून नंतर संपूर्ण मेंदूच कृत्रिम पद्धतीने तयार करण्याची ही योजना आहे. त्यामुळे मेंदू विज्ञानात मोठी क्रांती घडून येणार आहे.

आव्हाने
मेंदूविज्ञानात दरवर्षी ६०,००० शोधनिबंध सादर होतात. एवढय़ा शोधनिबंधातील माहितीची सांगड घालणे अवघड काम आहे. एक न्यूरॉनची नक्कल करण्यासाठी एका लॅपटॉपइतकी ऊर्जा लागते, तर अब्जावधी न्यूरॉन्स कृत्रिमरीत्या बनवून वापरण्यासाठी किती ऊर्जा लागेल याची कल्पनाच केलेली बरी. आताच्या सर्वात वेगवान संगणकापेक्षा हजारो पटींनी वेगवान संगणक त्यासाठी लागेल.

फायदा काय?
मानवी मेंदू संशोधन प्रकल्पामुळे आपली मेंदूविषयीची माहिती अधिक परिपूर्ण होणार आहे.  स्वमग्नता, नैराश्य, कंपवात (पार्किन्सन), स्मृतिभ्रंश या मेंदूरोगांवर अधिक चांगली औषधे तयार करता येतील. त्यांच्या चाचण्याही घेता येतील. मेंदूविषयक अपंगत्वावर मात करणारी नवीन साधने तयार करता येतील. जगातील लोकसंख्येपैकी अनेक लोक वृद्धत्वाकडे झुकत असून त्यांच्यापैकी एक तृतीयांश लोकांना तरी मेंदूचा काहीना काही आजार होणार आहे. त्यामुळे मेंदूचे संशोधन महत्त्वाचे आहे.

विविध देशांचा सहभाग
मेंदू संशोधन प्रकल्पाचे नियोजन स्वित्र्झलडमधील ‘एकोल पॉलिटेक्निक’ या संस्थेचे मेंदू वैज्ञानिक हेन्री मरक्रम करणार आहेत. त्यांच्याबरोबर हायडेलबर्ग विद्यापीठाचे कार्लहेन्झ मेयर व लॉसेन विद्यापीठाचे रिचर्ड  फ्रॅकोविक काम करणार आहेत. युरोपातील अनेक देश यात सहभागी असून अमेरिका, चीन,कॅनडा, इस्रायल हे देशही संशोधनात भाग घेणार आहेत. इंग्लंडची वीस संशोधक पथके त्यात आहेत. किंग्ज कॉलेज, लंडन या संस्थेचाही त्यात सहभाग आहे. एकूण ८० संस्थांनी या प्रकल्पाची धुरा सांभाळली आहे.

हा प्रकल्प अतिशय उत्कंठावर्धक आहे. त्यात युरोपातील अनेक नामवंत मेंदूवैज्ञानिक सहभागी असून आपले मेंदूविषयीचे आकलन या मूलभूत संशोधनामुळे वाढणार आहे.
निकोलस रोझ, विभागप्रमुख सामाजिक शास्त्रे, किंग्ज कॉलेज लंडन

मानवी मेंदू ही निसर्गाची सुंदर निर्मिती आहे व ते एक अत्यंत कार्यक्षम यंत्र आहे. पण त्याचे कार्य नेमके कसे चालते, हे समजणे फार अवघड आहे. बहुमितीय दृष्टिकोन अवलंबला तरच  या गुंतागुंतीच्या अवयवाचा अभ्यास, महासंगणक पातळीवरील नक्कल व प्रत्यक्ष औषध निर्मिती शक्य होणार आहे.  
अ‍ॅलेक्स थॉमसन, यूसीएल स्कूल ऑफ फार्मसी