राजस्थान विधानसभा निकाल, बसपाला सरासरी ४ टक्के मते

मुंबई :  राजस्थानात काँग्रेसच्या जागांमध्ये गतवेळच्या तुलनेत पाच पट वाढ झाली असली तरी काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये एक टक्क्य़ांपेक्षा कमीच फरक आहे. लोकसभा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीत धुव्वा उडालेल्या बसपाला हिंदी भाषक पट्टय़ांतील तिन्ही राज्यांमध्ये सरासरी चार टक्के मते मिळाली आहेत.

राजस्थानातील १९९ पैकी ९९ जागा जिंकून काँग्रेसने काठावरचे बहुमत मिळविले आहे. भाजपला ७३ तर बसपाला सहा जागा मिळाल्या. काँग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये अंतर असले तरी मतांमध्ये एक टक्क्य़ांपेक्षा कमी मतांचे अंतर आहे. काँग्रेसला ३९.३ टक्के तर भाजपला ३८.८ टक्के मते मिळाली. सहा जागा जिंकणाऱ्या बसपाला चार टक्के मते मिळाली.

२०१३ मध्ये २१ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या जागांमध्ये पाच पट वाढ झाली असली तरी भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये फार काही अंतर नाही.

छत्तीसगडमध्ये ९० पैकी ६८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ४३ टक्के तर १६ जागा जिंकणाऱ्या भाजपला ३२ टक्के मते मिळाली. बसपाला एक जागा मिळाली असली तरी ३.८ एवढी मते मिळाली आहेत.

मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असली तरी भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली होती. तेलंगणात ११९ पैकी ८८ जागा जिंकणाऱ्या तेलंगणा राष्ट्र समितीला ४६.९ टक्के मते मिळाली.

मिझोरममध्ये ४० पैकी २६ जागा जिंकणाऱ्या मिझो नॅशनल फ्रंटला ३७.६ टक्के तर अवघ्या पाच चागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ३० टक्के मते मिळाली.

लोकसभा निवडणुकीत भोपळाही न फोडलेल्या आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडालेल्या बसपाला हिंदी पट्टय़ातील तीन राज्यांमध्ये सरासरी चार टक्के मतदान झाले.

राजस्थान

९९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ३९.३ टक्के मते

७३ जागा जिंकणाऱ्या भाजपला ३८.८ टक्के मते

सहा जागा जिंकणाऱ्या बसपाला चार टक्के मते

छत्तीसगड

९० पैकी ६८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ४३ टक्के मते

१६ जागा जिंकणाऱ्या भाजपला ३२ टक्के मते

बसपाला एक जागा मिळाली असली तरी ३.८ टक्के मते