जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील बोमिया गावात दडून बसलेल्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराचे जवान आणि पोलीस यांना शुक्रवारी दुपारी यश आले. अजूनही या गावात एक दहशतवादी लपून बसला असून, त्याच्याविरुद्ध चकमक सुरू असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहराजवळ असलेल्या बोमिया गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला आणि काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी या भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली. गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसले होते. त्यांच्याकडून जवानांवर गोळीबार सुरू झाल्यानंतर लगेचच त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या धुमश्चक्रीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दुसऱ्या जवानाला कंठस्नान घालण्यासाठी संबंधित घराला जवानांनी वेढा घातला असून, चकमक सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.