अपंग मुलांनाही इतरांप्रमाणे प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार असल्याने त्यांच्यासाठी सरकार अनेक योजना, सवलती देऊ करते. देशात अपंग मुलांना सांभाळणारी अनेक वसतीगृह आहेत. त्यांना सरकार आर्थिक मदत देखील करते. पण यामागील सत्यस्थिती आणि सुरू असलेला भ्रष्टाचार क्वचितच समोर येतो.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे(एनएचआरसी) अध्यक्ष न्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी कथन केलेल्या एका उदाहरणाने अपंग मुलांना शासकीय वसतीगृहात सामोरे जाव्या लागणाऱया अडचणी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.
सरकार पैसा पुरवत असलेल्या अपंग मुलांच्या एका वसतीगृहाला दत्तू यांनी भेट दिली असता तेथे एकूण ४९ अपंग मुलं केवळ एका टूथब्रशने ब्रश करत असल्याचे भयानक वास्तव त्यांच्या समोर आले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दत्तू यांनी या वास्तवाची आठवण करून दिली.

दत्तू म्हणाले की, तब्बल ४९ अपंग मुलं एकच थूटब्रश आणि एकच टूथपेस्ट वापरणारे वसतीगृह कोणत्या राज्यातील आहे, याला महत्त्व नाही. खरंतर ही एक घटना देशातील सर्वच अपंग मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या सद्यस्थितीचे वर्णन करणारी आहे.
सरकार कोटीच्या कोटी रुपयांची मदत जाहीर करते, पण ही मदत प्रत्यक्षात पोहोचते का? हा प्रश्न आजही कायम आहे, असेही ते पुढे म्हणाले. या एका वसतीगृहातील हे भयानक वास्तव समोर आल्यानंतर दत्तू यांनी सर्व राज्यातील शासकीय मदत मिळणाऱया अपंग मुलांच्या आणि वृद्धाश्रमांच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. तेथे प्रत्येकाला निदान प्राथमिक सुविधा तरी दिल्या जातात का? याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.