अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या वर्षभराच्या कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. तसेच अनेक वादांनाही तोंड फुटले. त्यांचा हा अल्पसा आढावा..

* पर्यायी तथ्ये – ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून प्रसारमाध्यमे खोटारडेपणा करत असल्याचा दावा केला. त्यांच्या विधानांचे स्पष्टीकरण देता त्यांचे सहकारी केल्यान कॉनवे यांनी ते पर्यायी तथ्ये(आल्टरनेटिव्ह फॅक्ट्स) मांडत असल्याचे सांगितले.

* पॅरिस करारातून माघार – पॅरिस येथे २०१५ साली पार पडलेल्या जागतिक हवामानबदल नियंत्रण परिषदेत १९५ देशांनी हवामानबदल रोखण्यासाठीच्या कराराला मान्यता दिली. ट्रम्प यांनी त्या करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

* श्वेत वर्णवर्चस्ववाद्यांचे कौतुक – ऑगस्ट महिन्यात व्हर्जिनिया राज्यात वांशिक हिंसाचार उसळला. त्या वेळी दोन्ही वादग्रस्त गटांमध्ये काही चांगली माणसे आहेत, असे म्हणत ट्रम्प यांनी श्वेत वर्णवर्चस्ववाद्यांचे एक प्रकारे कौतुकच केले.

* एफबीआय संचालकांची हकालपट्टी – हिलरी क्लिंटन यांच्या ईमेल आणि अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपासंबंधी प्रकरणांचा तपास करणारे एफबीआयचे संचालक जेम्स कॉमी यांची ट्रम्प यांनी हकालपट्टी केली. या निर्णयावरून बराच वाद झाला.

* गोळीबाराच्या घटना मानसिक अनारोग्याच्या द्योतक – अमेरिकेतील गन व्हायोलन्स अक्राइव्हच्या नोंदींनुसार देशात गतवर्षी १३ हजार नागरिकांचे प्राण गोळीबाराच्या घटनांमध्ये गेले. ट्रम्प यांनी मात्र हा मानसिक अनारोग्याचा प्रश्न आहे, असे म्हणत त्याला फारसे महत्त्व दिले नाही.

* मुस्लीम बंदी – लिबिया, सुदान, सीरिया, इराण, इराक, येमेन आणि सोमालिया या मुस्लीमबहुल देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवासावर ट्रम्प यांनी बंदी घातली. मात्र त्याला विरोध झाल्यावर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन ट्रम्प यांना हा निर्णय सौम्य करावा लागला. नव्या आदेशात इराक आणि सुदान वगळून चाड, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश करण्यात आला.

* ओबामाकेअरला विरोध – यापूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नागरिकांना सवलतीच्या दरांत आरोग्यसुविधा पुरवणारे विधेयक संमत केले होते. ट्रम्प यांचा त्याला विरोध होता. ओबामाकेअर म्हणून ओळखले जाणारे हे विधेयक रद्द करण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात ट्रम्प यांचा थोडक्यात पराभव झाला आणि ते तोंडघशी पडले.

* स्कारामुसी यांची हकालपट्टी – अँथनी स्कारामुसी यांची व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नेमणूक झाली होती. मात्र ‘द न्यूयॉर्कर’ नियतकालिकात त्यांची वादग्रस्त मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

* हवामानबदलाबद्दल हटवादी भूमिका – ऑगस्टमध्ये हार्वे या वादळाने ओहायो राज्याला, तर सप्टेंबरमध्ये अरमा या वादळाने फ्लोरिडा राज्याला तडाखा दिला. अमेरिकी इतिहासातील सर्वात मोठय़ा वादळांपैकी ही दोन वादळे होती. मात्र तरीही ट्रम्प यांचे जागतिक हवामानबदलासंबंधी विचार बदलले नाहीत.

* आफ्रिकी-अमेरिकींचा अवमान – अमेरिकेत २०१६ साली आफ्रिकी-अमेरिकी वंशाच्या नागरिकांविरुद्ध पोलिसांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या. त्यांचा निषेध म्हणून कृष्णवर्णीय फुटबॉल खेळाडूंनी मैदानात राष्ट्रगीत वाजवले जात असताना पायाच्या एका गुडघ्यावर टेकून निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांनी अलाबामा येथे झालेल्या सभेत अपशब्द वापरून त्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढा, असे म्हटले.

* इस्रायलसंबंधी भूमिकेने वाद – इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या भेटीत ट्रम्प यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्या द्विराष्ट्रवादाच्या भूमिकेवर वादग्रस्त विधान केले. अमेरिकेचा दूतावास तेल अविवमधून जेरुसलेमला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मध्यपूर्वेतील तणाव वाढला.

* उत्तर कोरिया वाद – उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या युद्धखोर भूमिकेला ट्रम्प यांनी तितक्याच प्रक्षोभक भाषेत उत्तर दिले. त्याने या प्रदेशात युद्धाचे ढग जमा झाल्याची स्थिती उद्भवली आहे.