मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीत सत्ताधाऱयांवर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. पूर्वी दर महिन्याला कोट्यावधींचा घोटाळा जनतेसमोर यायचा व त्याला जनता कंटाळली होती. आज काळ्या पैशाची यादी मागणारेच काळ्या धनाचे समर्थक झाले आहेत, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी काँग्रेसवर चौफेर टीका केली. केंद्रतील भाजपप्रणीत एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी गेल्या वर्षभरात मोदी सरकारने केलेल्या कामांशी निगडीत विविध पैलूंवर संवाद साधला.
केंद्र सरकारने काळा पैसा दडवणाऱया खातेधारकांची नावे जाहीर केल्यास आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन होईल व यापुढे भारताला माहिती मिळणे बंद होईल अशी माहिती अमित शहा यांनी यावेळी दिली.
यूपीए सरकारच्या काळात देशाचे काहीही नुकसान झाले नसल्याचा दावा करणाऱयांनी जनतेला उत्तरे द्यावीत असा टोलाही शहा यांनी लगावला. सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा काळ्या पैशाबाबत एसआयटीचा निर्णय घेऊन ४५ दिवसांत जनतेकडून आलेल्या ७०० सूचना एसआयटीला दिल्याचेही शहा यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या कार्याची स्तुती करत शहा यांनी मोदींमुळे पंतप्रधान कार्यालयाची प्रतिमा सुधारली असल्याचे म्हटले. तसेच भारतातच नाही तर जगभरात मोदींनी विश्वास संपादित केला. एका वर्षात मोदी सरकारचे काम दिसून येते, आधीच्या सरकारला केलेली कामे शोधावी लागायची, अशी खोचक टीका शहा यांनी काँग्रेसवर. गेल्या वर्षभरात मोदी सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनांचीही माहिती यावेळी शहा यांनी दिली.