११ जखमी; बंदीनंतर तीन वर्षांनी प्रथमच आयोजन

सर्वोच्च न्यायालयाने लादलेल्या बंदीनंतर वळूंवर नियंत्रण मिळविण्याच्या जलिकट्टू या दक्षिणेतील प्रसिद्ध खेळादरम्यान एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू तर ११ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तमिळनाडूचे महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांनी या उत्सवाचे उद्घाटन केले. या वेळी जवळपास हजारावर वळूंना मैदानात सोडण्यात आले होते. या वळूंवर नियंत्रण मिळविणाऱ्यांवर सोन्याच्या नाण्यांसह इतर आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

महाराष्ट्रातील बैलांच्या शर्यतीवर बंदी घातल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दक्षिण भारतातील जलिकट्टू या शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या साहसी खेळावरही बंदी घातली होती. मात्र, तमिळनाडू सरकारने कायद्यात बदल करत हा खेळ सुरूच ठेवला आहे. या खेळादरम्यान हजारो लोक वळूंवर नियंत्रण मिळविण्यासाठी सहभागी होतात. यापैकी अनेकांना जायबंदी व्हावे लागते. यामुळे वळूंचेही हाल होत असल्याच्या कारणाने सर्वोच्च न्यायालयाने मे २०१४मध्ये ही बंदी घातली होती. याविरोधात प्रचंड निदर्शने झाली होती.

सोमवारी तमिळनाडूतील विविध भागांमध्ये तीन वर्षांच्या बंदीनंतर प्रथमच जलिकट्टूचे आयोजन करण्यात आले होते. साधारण जानेवारीचा तिसरा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये या खेळाचे आयोजन केले जाते.

सोमवारी पलामेडू या खेडय़ामध्ये जलिकट्टूचे आयोजन केले होते. या वेळी उधळलेल्या वळूने सुरक्षा जाळे तोडून तेथे उपस्थित दर्शकांवर हल्ला केला. यामध्ये एका १९ वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा जलिकट्टू खेळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या वेळी जवळपास १२०० वळू्ंचा वापर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे तेवढय़ाच संख्येने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती.

रविवारी स्पर्धकांसह ७९ जण जखमी झाले होते. पहिल्या जखमीची नोंद मदुराई येथील अवनीपूरम येथे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.