वितरण व्यवस्थेमधील त्रुटींमुळे कांद्याचे भाव भडकल्याचा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी काढला आहे. चलवाढीवर याचा तात्पुरता परिणाम होईल, असा दिलासा त्यांनी दिला आहे.
कांदा आणि भाजीपाल्यांचे वाढलेले भाव पाहता योग्य पद्धतीने पुरवठा कसा होईल त्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याच्या भावाने शंभरी गाठल्याने चलवाढीवर त्याचा परिणाम होणे अपेक्षित आहे. मात्र ही वाढ दीर्घकाळ टिकणारी नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. सप्टेंबरमध्ये घाऊक किंमत निर्देशांक ६.४६ टक्के तर अन्न चलनवाढीचा दर १८.४० टक्के इतका होता. एकदा कांदा बाजारपेठेत उपलब्ध झाला की तो आटोक्यात येईल. येत्या काही आठवडय़ांत तो खाली येण्याची अपेक्षा असल्याचे रंगराजन यांनी स्पष्ट केले. कांद्याचे भाव पुढच्या दोन ते तीन आठवडय़ांत उतरतील असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही नुकतेच स्पष्ट केले आहे. वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी पवार यांच्या मताला दुजोरा दिला होता.
कांद्याचा तुटवडा तात्पुरता
येत्या दोन ते तीन आठवडय़ांत कांद्याचे भाव खाली येतील असा दिलासा केंद्राने दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाने कांदा उत्पादनावर परिणाम झाला. मात्र या वेळी कांदा उत्पादन जास्त होईल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.  मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत कांदा आल्यावर परिस्थिती सुधारेल असे पवार यांनी स्पष्ट केले. कांद्याच्या वाढत्या भावाला निर्यातीला जबाबदार धरू नये असे पवार यांनी स्पष्ट केले.