कांद्याचे दर गेल्या दोन आठवडय़ात लासलगावच्या घाऊक बाजारपेठेत १८.५० रुपये किलो झाले असून ही वाढ ४० टक्के आहे. कांद्याची किमान निर्यात किंमत वाढवूनही कांदा पुन्हा रडवण्याची चिन्हे आहेत.
कांद्याच्या किमती खरिपाच्या मोसमातील कमी पावसाने वाढल्याचा अंदाज असल्याचे राष्ट्रीय फलोद्यान संशोधन व विकास महासंघाचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी सांगितले. नाशिकमधील लासलगावच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढल्याचा परिणाम दिल्लीच्या आझादपूर बाजारपेठेत दिसू लागला असून तेथे कांद्याचे भाव १५ ते २५ रुपये किलो आहेत. लासलगावला कांद्याचे भाव १३.२५ रु. किलोवरून १८.५० रु. किलो झाले आहेत.
१७ जूनला केंद्राने कांद्याच्या किमान निर्यात किमतीत टनामागे ३०० अमेरिकी डॉलरची वाढ करूनही कांद्याचे भाव नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. गेल्या एक महिन्यात कांद्याचे भाव ९० टक्के वाढले आहेत. मे महिन्यात कांद्याचे भाव ९.७५ रु. होते ते आता १८.५० रु. झाले आहेत.
गुप्ता यांनी सांगितले की, दुष्काळाच्या भीतीने कांद्याचे भाव वाढले आहेत, कारण कांद्याचा पुरवठा आता कमी होत जाणार आहे. रब्बीचा ३९ लाख टन कांदा साठवलेला होता पण ते पुरेसे नाही. खरिपाचा कांदा आल्याशिवाय कांद्याचे भाव कमी होणार नाहीत पण मान्सूनने दगा दिल्याने खरिपाचा कांदा कसा येणार, हा प्रश्नच आहे.
२०१३-१४ या काळात कांद्याचे पीक १९२ लाख टन इतके वाढण्याची अपेक्षा होती २०१२-१३ मध्ये कांद्याचे उत्पादन १६८ लाख टन होते. दरम्यान कांद्याची निर्यात १३.५८ लाख टनांनी घटली असून गेल्या वेळी ती १८.२२ लाख टन होती. कांदा हे देशात रब्बी पीक आहे पण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशात ते खरिपाचे पीक म्हणूनही घेतले जाते.