सध्या देशभरात कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात कांद्याचे भाव ४० ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर घाऊक बाजारात ६० ते ७० रुपयांनी कांदा विकला जात आहे. कांद्याला सोन्याचा भाव आला आहे म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. कारण बिहारमधील पाटणा येथे चोरांनी चक्क कांद्यावर डल्ला मारला आहे. चोरांनी बंद गोडाऊनमधून तब्बल आठ लाख किंमतीचा कांदा चोरला आहे.

व्यापाऱ्याने यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरांनी कांद्याची ३२८ पोती चोरली असून बाजारभावानुसार एकूण आठ लाख किंमतीचा कांदा चोरीला गेला असल्याची व्यापाऱ्याची तक्रार आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपासही सुरु केला आहे. चोरांनी कांद्यासोबत तिजोरीतील १.८३ लाखांची रोख रक्कमही लंपास केली असल्याचं व्यापाऱ्याने तक्रारीत म्हटलं आहे.

गोडाऊनच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. “याप्रकऱणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धीरज कुमार यांनी कांद्याची ३२८ पोती चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. आम्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती पोलीस अधिकारी मनिष कुमार यांनी दिली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे बिहारामध्ये कांद्याचा दर वाढला आहे. बिहारला महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमधून कांदा निर्यात होतो. जुलै महिन्यात कांद्याचा दर १८-२० रुपये किलो होता. गेल्या आठवड्यात हा दर ७० रुपयांवर पोहोचला. सणासुदीचे दिवस असल्यामुळे येणाऱ्या दिवसांत कांदा ८० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.