भारतात आरोग्य आणि इतर खर्चांसाठी बचत करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे असे आपण अनेकदा ऐकतो. निवृत्त झाल्यानंतर आपल्याला उतारवयात आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी ही बचत केली जाते असे म्हणतात. उतारवयात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि दैनंदिन गरजांसाठी हा निधी साठवावा अशी यामागे मानसिकता असते. मात्र नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, केवळ ३३ टक्के भारतीय निवृत्तीनंतरच्या खर्चांसाठी नियमित बचत करतात असे समोर आले आहे. तर जगातही हे प्रमाण साधारण तेवढेच आहे. म्हणजेच कमावणाऱ्या ३ व्यक्तींमागील १ व्यक्ती नियमितपणे निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी बचत करते. निवृत्तीनंतर आपल्या आर्थिक गरजा काय असतील याबाबत पुरेसे ज्ञान नसल्याने हे प्रमाण कमी असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

अनेक जण उतारवयापेक्षा आताच्या आर्थिक गरजा भागविण्याचा विचार आधी करतात त्यामुळे ही आकडेवारी कमी असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. यामध्ये १६०० तरुणांचे एचएसबीसीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी १६ देशांतील तरुणांचा अभ्यास करण्यात आला होता. यात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटीना, कॅनडा, तैवान, चीन, मलेशिया, मॅक्सिको, सिंगापूर, फ्रान्स, हाँगकाँग, भारत. इंडोनेशिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. नोकरी करण्याच्या वयातील केवळ १९ टक्के लोक भविष्यातील तरतुदींसाठी बचत करतात. त्यातील ३३ टक्के नियमित बचत करणारे आहेत.

आपण निवृत्त होणार आहोत हे अनेकांना आजही मान्य नसते. याचे कारण म्हणजे प्रत्यक्ष नोकरीतून निवृत्त झालो तरीही ५० हून अधिक टक्के लोक नवीन व्यवसाय सुरु करण्याचे किंवा आणखी काही करण्याचे ठरवतात. त्यामुळे आपल्याला कोणत्याही उत्तपन्नाशिवाय किती वर्ष जगायचे आहे याचे गणित त्यांच्याकडे नसते. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती आर्थिक गरज आहे याची केवळ दोन तृतीयांश लोकांना कल्पना असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.