भारतात सातत्याने दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, देशातील 59 मुख्य विमानतळांपैकी केवळ 6 विमानतळांवरच सीआयएसएफची टीम बॉम्ब निष्क्रीय करू शकते. म्हणजे केवळ दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, कोचिन आणि हैदराबाद या सहा ठिकाणीच बॉम्ब निष्क्रीय करण्याची सुविधा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान केलेल्या पाहणीमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे. सहा विमानतळांपैकी फक्त कोलकाता आणि चेन्नई विमानतळ हे एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे(AAI) चालवले जातात, इतर विमानतळ खासगी आहेत. ब्यूरो फॉर सिविल एविएशन सिक्युरिटी (BCAS) च्या नियमांनुसार, विमानतळावर जवळपास 28 वस्तूंचा वापर बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी केला जातो. पण या सर्व आवश्यक वस्तू केवळ 6 विमानतळावरच उपलब्ध असल्याची माहिती आहे. सीआयएसएफच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 28 वस्तूंपैकी एकही वस्तू नसेल तर बॉम्ब निष्क्रीय करता येत नाही. याबाबत AAI, BCAS आणि सिव्हील एविएशन मंत्रालयाला पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे असं या अधिका-याने सांगितलं.