अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६-२०१७ या काळात फक्त७५० अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरल्याचे उघड झाले आहे. त्यावेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. व्हाइट हाऊसमध्ये त्यांचे पहिले वर्ष यात पूर्ण झाले होते.

माध्यमांच्या बातम्यांनुसार ते व त्यांच्या कंपन्यांनी २०१७ मध्ये भारतात १,४५,४०० अमेरिकी डॉलर्स इतका प्राप्तिकर भरला आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २०१६ मध्ये रिंगणात उतरले व निवडून आले. त्यांचा डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावरचा विजय हा आश्चर्यकारक मानला जात होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या वर्षी निवडणूक जिंकली त्या वर्षांत  केवळ ७५० डॉलर्सचा कर भरला असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांतील प्राप्तिकर नोंदी यात तपासण्यात आल्या. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतील झंझावाती चर्चा मंगळवारपासून डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्या समवेत सुरू होत असतानाच ट्रम्प यांनी प्राप्तिकर बुडवल्याची गोष्ट सामोरी आली आहे. त्याआधीच्या पंधरा वर्षांपैकी दहा वर्षांत ट्रम्प यांनी एक पैसाही प्राप्तिकर भरलेला नाही. आपल्याला तोटाच झाला असे त्यांनी दाखवले होते. अमेरिकी अध्यक्षांना कायद्याप्रमाणे व्यक्तिगत आर्थिक माहिती जाहीर करणे बंधनकारक नाही, पण रिचर्ड निक्सन यांनी एकदा आर्थिक माहिती जाहीर केली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या प्राप्तिकराची माहिती देण्यास नकार दिला होता. त्यांचे आर्थिक विवरण मागणाऱ्यांना त्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. दी न्यूयॉर्क टाइम्सच्या शोध वृत्तानुसार ट्रम्प यांनी अमेरिकी लोकांना असत्य कथन केले असून त्यांच्या खऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ट्रम्प यांनी लाखो डॉलर्सची माया जमवूनही तोटा दाखवून प्राप्तिकर भरलेला नाही. न्यूयॉर्क टाइम्सला ट्रम्प यांची २०१८, २०१९ मधील आर्थिक माहिती मिळालेली नाही, पण त्या आधी ट्रम्प यांनी वीस वर्षांत अनेक कंपन्या उभ्या केल्या व त्यात तोटा दाखवला आहे. व्हाइट हाऊसमधील पहिल्या दोन वर्षांत त्यांचा परदेशातील महसूल ७३ दशलक्ष डॉलर्स होता. त्यातील बराचसा स्कॉटलंड व आर्यलडमधील गोल्फ मालमत्तेशी संबंधित होता. फिलिपिन्स ३ दशलक्ष डॉलर्स व भारत २.३ दशलक्ष डॉलर्स, तुर्कस्थान १० लाख डॉलर्स असा त्यांचा महसूल होता. २०१७ मध्ये त्यांनी अमेरिकेत ७५० डॉलर्स  कर भरला. पनामात १५,५९८ डॉलर्स, भारतात १,४५,४०० डॉलर्स, फिलिपिन्स १,५६,८२४ डॉलर्स या प्रमाणे करभरणा त्यांनी केला आहे.

ट्रम्प यांचे स्पष्टीकरण

ट्रम्प यांनी सांगितले की, आपण १०८ पानी करविवरण पत्रे भरली असून भरपूर पैसा करापोटी भरला आहे. दी न्यूयॉर्क टाइम्सने दिलेली बातमी फेक न्यूज म्हणजे खोटी बातमी असून त्यात काही तथ्य नाही. अमेरिकी महसूल खात्याने मला वाईट वागणूक दिली. तेच दी न्यूयॉर्क टाइम्सने आता केले आहे.