मोदी सरकार सत्तेत आल्यापासून फक्त भाषणबाजी सुरू असून शासनव्यवस्था मात्र ढिम्म आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली . मोदी सरकारच्या द्विवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी अहमदाबादमध्ये पत्रकारपरिषद घेऊन मोदी सरकारवर टीका केली. गेल्या २४ महिन्यांत मोदींनी काहीही काम न करणारा चांगला वक्ता, असा लौकिक कमावल्याची खोचक टीका तिवारी यांनी केली. मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. मोदींनी परराष्ट्र धोरणाला सर्वोच्च प्राधान्य देऊनही त्यामध्ये त्यांना अपयश आले. याशिवाय, भाजपने शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध पूर्णपणे बिघडवून ठेवले आहेत. मसुद अझरला दहशतवादी ठरविण्याच्या मुद्द्यावरून चीन भारताला संयुक्त राष्ट्रसंघात विरोध करत आहे. तसेच अमेरिकेशी संबंध सुधारण्याच्यादृष्टीने कोणतेही नवे पाऊल सरकारने उचललेले नाही, असे तिवारी यांनी म्हटले. तुम्ही गेल्या दोन वर्षांतील एकुणच परिस्थिती बघाल तर मोदींनी परदेश दौऱ्यांवर पैसे खर्च करण्याव्यतिरिक्त फार काही केलेले नाही. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांना अत्यंत साधा प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही जनतेला ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सबका विकास’चे आश्वासन दिले होते. गेल्या दोन वर्षांत ही आश्वासने पूर्ण झाली आहेत का?, सामान्य लोकांच्या जीवनात कोणताही फरक पडला आहे का, असे सवाल यावेळी तिवारी यांनी उपस्थित केले.