राम मंदिर न्यासाचे संत आणि भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार राम विलास वेदांती महाराज यांनी ज्याप्रकारे बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्याचप्रमाणे राम मंदिर उभं केलं जाईल असं वक्तव्य केलं आहे. मंदिराचं बांधकाम करण्याची सर्व योजना तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र यासंबंधी प्रश्न विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. वेदांती यांचं वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

वेदांती  महाराज विश्व हिंदू परिषेदेसोबत देखील जोडले गेले आहेत. यासंबंधी नुकतंच त्यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘२०१९ च्या आधी जर राम मंदिरासंबंधी काही निर्णय़ होऊ शकला नाही, तर माझ्या डोक्यात एक योजना तयार आहे. ज्याप्रकारे अचानक मशीद पाडण्यात आली त्याप्रकारे रात्रीच मंदिराचं बांधकाम सुरु केलं जाऊ शकतं’.

वेदांती यांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांना घाई करायची नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजून वेळ द्यायचा आहे. प्रवीण तोगडियादेखील लवकरच अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. ‘भाजपा एकमेव पक्ष आहे जो राम मंदिर उभारु शकतं. २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा भाजपाची सत्ता येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील’.