स्वच्छतेसाठी निधीची तरतूद करुन देश स्वच्छ होणार नाही. देशातील जनतेने स्वच्छतेचा निर्धार केला तरच हे शक्य होऊ  शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे.  जसे सत्याग्रहींनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले होते तसे आता अस्वच्छतेपासून मुक्त करण्यासाठी देशाला स्वच्छाग्रहींची गरज आहे असेही मोदी म्हणालेत.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे स्वच्छता मोहीमेसंदर्भातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पाकिस्तानवर सर्जिकल अॅटेक केल्यानंतर मोदींचे हे पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतात याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण मोदींनी या कार्यक्रमात स्वच्छता मोहीमेवर मत मांडले. कोणालाच अस्वच्छता आवडत नाही, पण मग आपण त्यापासून लांब का जाऊ शकत नाही असा सवाल  मोदींनी उपस्थित केला. अनेक जण आपले घर स्वच्छ ठेवतात, पण घरातील कचरा घराजवळील मोकळ्या मैदातान टाकण्याची चुकीची सवय त्यांना असते. एक देश म्हणून आपण आपल्या सभोवतालचा परिसर, गाव, शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला तर देश स्वच्छ होईलच असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान या मोहीमेचे कौतुक केले. स्वच्छ भारत अभियानामुळे जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण झाली. आता शाळेत जाणा-या मुलांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजले आहे असे मोदींनी सांगितले. देशभरात स्वच्छतेचे महत्त्व निर्माण होण्यामागे माझ्यापेक्षा जास्त प्रसारमाध्यमांचा हात आहे, त्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली असेही मोदींनी सांगितले. आता राज्याराज्यात स्वच्छतेच्या बाबतीत स्पर्धात्मक वातावरण आहे.  अस्वच्छता बघून मनात अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे असेही ते म्हणालेत. हा देश आपला आहे, सरकारही आपलेच आहे आणि सरकारी मालमत्तादेखील आपली आहे ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण झाल्यावरच देशातील चित्र बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.