News Flash

यूपीतील ‘या’ शहरात आता धावणार फक्त सीएनजी वाहने

अलाहाबादमधील परिवहन विभागाच्या विभागीय आयुक्तांनी घेतला निर्णय

allahabad, cng, up
अलाहाबादमधील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शहराचे विभागीय आयुक्त आशिष गोयल यांनी सांगितले.

प्रदूषणाच्या समस्येने देशातील सर्वच शहरांना, महानगरांना ग्रासले आहे. यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते आहे. हवा, पाणी प्रदूषित झाल्याचा विपरित परिणाम सर्वांनाचा भोगावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात. असाच एक नवा निर्णय अलाहाबादमधील परिवहन विभागाच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या २० जूनपासून अलाहाबाद शहरातील रस्त्यांवर केवळ सीएनजी गाड्याच धावू शकणार आहेत.

अलाहाबादमधील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शहराचे विभागीय आयुक्त आशिष गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले, शहरातील रस्त्यांवर २० जूनपासून केवळ सीएनजीवर चालणाऱ्या बसेस, रिक्षा आणि टेम्पोच धावू शकतील. अन्य इंधनावर चालणाऱ्या या स्वरुपाच्या वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात येईल. त्याचबरोबर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना वेगळा रंग असेल. बसेसचे मार्गही निश्चित करण्यात येतील आणि वेगळे असतील. अलाहाबादच्या ग्रामीण भागातही काही प्रमाणात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. ग्रामीण भागामध्ये सीएनजीवर चालणाऱ्या बस आणि टेम्पोंना प्राधान्य देण्यात येईल.

शहरातील बेकायदा ई-रिक्षांविरोधात मोहीम उघडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या रिक्षाचालकांना शोधून त्यांच्यावर कडक करवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सम-विषम पद्धतीने चारचाकी गाड्या रस्त्यावर आणण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सुरुवातीला टीका झाली होती. पण नंतर अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. त्याचबरोबर या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याचेही त्यावेळी उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते.

वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागांतून अनेक लोक रोजगाराच्या, नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थलांतरित होत आहेत. यामुळे शहरातील लोकसंख्या वाढते आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी गाड्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. यामुळे शहरांमध्ये सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणामुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे विकार झाल्याची उदाहरणे दिसू लागली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 11:20 am

Web Title: only cng vehicles on allahabad road from 20 june
Next Stories
1 गोव्यात पादचारी पुल कोसळला; दोघांचा मृत्यू, ३० जण अजूनही बेपत्ता
2 Arun Jaitley: काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती सुधारण्यालाच प्राधान्य- अरुण जेटली
3 जेठमलानींची वक्तव्ये अपमानजनक, केजरीवालांनी स्वत: यावे; दिल्ली हायकोर्टाने सुनावले
Just Now!
X