मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी आवर्जून उपस्थितीत राहण्याचा प्रयत्न करतात. दु:खाच्या प्रसंगात कुटुंबाला मानसिक आधार देण्याचा त्यामागे हेतू असतो. पण करोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या अंत्यविधीला फक्त चारच जण उपस्थित होते. तामिळनाडूत करोना व्हायरसमुळे बुधवारी रात्री पहिला मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या मृतव्यक्तीच्या अत्यंविधीला फक्त चारच जण उपस्थित होते. मदुराई शहरातील अण्णानगरमध्ये हा व्यक्ती रहायचा. या व्यक्तीचा मृतदेह दफनभूमीमध्ये आणला त्यावेळी पत्नी, मुलगा आणि दोघे भाऊ असे चारच जण हजर होते. रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह थेट दफनभूमीकडे नेण्यात आला.

कुटुंबीयांसह पोलिसांची एक टीम दफनभूमीमध्ये उपस्थित होती. वैद्यकीय पथक किंवा स्वच्छता करणारी टीम तिथे नव्हती. पहाटे पाचवाजता दफनविधी पूर्ण झाला. दरम्यान हा माणूस जिथे राहत होता, त्याच्या घराच्या दिशेने जाणारे रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. त्या मार्गावरील ६० घरांमधील नागरिकांवर अत्यंत बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

कोणीही तिथून बाहेर निघू नये, यासाठी आठ ठिकाणी बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. दरम्यान मृत्यू झालेल्या या व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता अशी माहिती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री विजयभास्कर यांनी दिली. मृत्यू झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केला नव्हता. त्याला कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनबरोबर श्वसनाचाही विकार होता. हा रुग्ण स्टेरॉइडवर होता.