करोनामुळे देशासह काही राज्यांची स्थिती गंभीर होत चालली आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढल्यानं रुग्णांची संख्याही वाढत चालली असून, राज्य व शहरांनिहाय लॉकडाउन लागू केला जात असल्याचं चित्र आहे. कर्नाटकातही करोनामुळे स्थिती चिंताजनक आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे आता केवळ देवच आपल्याला करोनापासून वाचवू शकतो, असे उद्गार कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. स्त्रीरामुलू यांनी काढले.

कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. स्त्रीरामुलू हे चित्रदुर्गा येथे पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकातील करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी त्यांनी भाष्य केलं. “जगभरात करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सगळ्यांनी सर्तकता बाळगायला हवी. तुम्ही सत्तेत असाल वा विरोधी बाकांवर. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब, हा विषाणू असा कोणताही भेदभाव करत नाही. मला शंभर टक्के खात्री आहे की, पुढील दोन महिन्यात रुग्णांची संख्या वाढेल. सध्या असे दावे केले जात आहेत की, सरकारचे दुर्लक्ष होत आहे किंवा मंत्र्यांच्या बेजबाबदारपणामुळे वा मंत्र्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. पण या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही. सत्य माहितीपासून हे दूर आहेत. आता केवळ देवच आपल्याला करोनापासून वाचवू शकतो,” असं उद्गार स्त्रीरामुलू यांनी काढले.

प्रादुर्भाव वाढल्यानं बंगळुरूमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला असून, बुधवारी कर्नाटकमध्ये ३००० करोना बाधित रुग्ण आढळून आले. ही कर्नाटकातील दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांची उच्चांकी वाढ आहे. सध्या कर्नाटकातील एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार २५३ इतकी आहे. यापैकी १८ हजार ४६६ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात ९२८ लोकांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे.