काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर आता विरोधकांनी सरकारवर आगपाखड करायला सुरूवात केली आहे. माजी संरक्षण मंत्री ए.के.अँटोनी यांनी तर थेट काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकाळाची तुलना करताना आमच्या काळात केवळ एकदाच भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे सांगितले. आम्हाला या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात केवळ एकदाच अशी घटना घडली होती. तर भाजप सरकारच्या काळात तब्बल तीनवेळा असा प्रकार घडला आहे. या सगळ्याचा भारतीय सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला असून एकूणच सुरक्षाव्यवस्थेविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सैन्याला योग्यवेळी मोकळीक देण्याची गरज ए.के. अँटोनी यांनी व्यक्त केली. माझा स्पष्ट संदेश आहे की, पाकिस्तानच्या अमानवी, नृशंस, क्रूर कृत्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याला मोकळीक द्यायला पाहिजे. सैन्याला काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने हाताळून द्याव्यात, असेही अँटोनी यांनी सांगितले.

तत्पूर्वी भारतीय सैन्याने मंगळवारी पाकिस्तानने कृष्णा घाटी सेक्टरमध्ये केलेल्या हल्ल्याचा वचपा काढला. सोमवारी रात्री पाकच्या दोन चौक्यांवर भारतीय जवानांच्या तुकडीने हल्ला केला असून त्यात पाकच्या ७ सैनिकांना कंठस्नान घातले. भारतीय जवानांनी कृष्णा घाटीजवळील किरपान आणि पिंपल या दोन चौक्यांना लक्ष्य केले. या चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात पाकचे ७ सैनिक ठार झाले.

दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आगामी काळात काश्मीरमध्ये आत्मघाती हल्ले वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. काश्मीरजवळील नियंत्रण रेषेच्या दिशेने दहशतवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्या आहेत. त्याचबरोबर काश्मीरमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांना त्यांच्या म्होरक्यांनी आणखी हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे अजूनही कार्यरत आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवरून काही दहशतवादी नियंत्रण रेषेच्या दिशेने आले असल्याचे दिसून आले आहे. हे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये आधीच दडून बसलेले दहशतवादी आपल्या कारवाया वाढवण्याची शक्यता अधिक आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लष्कराच्या छावण्यांवर तसेच बीएसएफच्या चौक्यांवर हल्ले चढवून तेथील तैनात असलेल्या जवानांची हत्यारे लुटण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून केले जाण्याची शक्यता आहे. तसेच बँका लुटण्याचीही शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेले दहशतवादी आणि नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी एकत्र हल्ले चढवल्यास त्याचा सामना करणे भारतीय जवान आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना जड जाईल, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे हेच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान सतर्क झाले आहेत. लष्कराचे वरीष्ठ अधिकारी आणि बीएसएफचे अधिकारी संयुक्तपणे अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी रणनीती आखत आहेत.