आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे रविवार १६ फेब्रवुवारी रोजी, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्यास अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह पक्षांच्या नेते मंडळींना बोलवण्यात आलेले नाही. केवळ दिल्लीकर जनतेलाच या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

आम आदमी पार्टीचे नेते गोपाल राय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, केजरीवाल १६ फेब्रुवारी रोजी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणत्याही अन्य राज्याच्या मुख्यंत्र्यास किंवा राजकीय नेत्यास निमंत्रण पाठवले जाणार नाही. हा कार्यक्रम केवळ दिल्लीवासींयासाठी असणार आहे.

या अगोदर माजी उपमुख्यमंत्री व आपचे नेते मनिष सिसोदीया यांनी देखील दिल्लीवासीयांना या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलेले आहे. दिल्लीचे पुत्र अरविंद केजरीवालजी आणि त्यांच्या नेतृत्वात नव्या सरकाराचा १६ फेब्रवारी रोजी रामलीला मैदानात शपथविधी होणार आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांची हिम्मत वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांनी १० वाजेपासून त्या ठिकाणी यावं. असं सिसोदीया यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा – केजरीवाल यांच्या शपथविधीला असणार अवघ्या एका वर्षाचा खास पाहुणा

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळालं आहे. दिल्लीतील ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवत आपने एकहाती सत्ता आणली आहे. तर, भाजपाला अवघ्या आठ जागा जिंकण्यात यश आलं आहे. दुसरीकडे तब्बल १५ वर्ष दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरं जावं लागलं आहे. मागील वेळीप्रमाणे यंदा देखील काँग्रेसला आपलं खातं देखील उघडता आलेलं नाही. एवढच नाहीतर काँग्रेसच्या ६३ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. केवळ तीन उमेदवारांनाच आपली अमानत रक्कम वाचवता आली आहे.