भगवान अय्यप्पाच्या ‘खऱ्या महिला भक्त’ शबरीमला मंदिराला भेट देण्याची शक्यता नसून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केवळ ‘महिला कार्यकर्त्यां’ या मंदिरात येतील, असे या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम मंडळाच्या अध्यक्षांनी (टीडीबी) म्हटले आहे. पर्वतीय भागात वसलेल्या या मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेशासाठी असलेली बंदी बेकायदेशीर व घटनाबाह्य़ असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने २८ सप्टेंबरला ही बंदी उठवली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून भाविकांना आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टीडीबी आणखी १०० एकर जागेची मागणी करेल, असे रविवारी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतल्यानंतर टीडीबीचे अध्यक्ष पद्मकुमार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत विचार करताना केवळ घटनात्मक, मूलभूत आणि लिंगविषयक मुद्दे विचारात घेतले. तथापि या धर्मस्थळाचे भौगोलिक स्थान आणि येथील विशिष्ट परिस्थितीही त्यांनी विचारात घ्यायला हवी होती, असे सांगून पद्मकुमार यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत असमाधान व्यक्त केले.
जंगलाच्या रस्त्याने अनेक किलोमीटर चालून येणे आणि लाखो लोकांच्या गर्दीचा त्रास सोसणे महिलांना शक्य आहे काय, असा प्रश्न अध्यक्षांनी विचारला. शबरीमलाच्या प्रथा व परंपरा यांचा आदर करणाऱ्या आणि येथील परिस्थितीची माहिती असणाऱ्या खऱ्या महिला भक्त येथे येण्याची शक्यता नसून, या निकालाच्या नावावर केवळ काही महिला कार्यकर्त्यां येथे येणे अपेक्षित आहे. मात्र येथे पोहोचणाऱ्या महिला भाविकांना आम्ही शक्य त्या सर्व सोयी पुरवू, असेही ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2018 9:57 pm