सत्ताधाऱ्यांचा जाहीरनामा
केरळमधील सत्तारूढ यूडीएफने बुधवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्वासाठी अन्न, गृहनिर्माण आणि आरोग्य अशी घोषणा देण्यात आली असून पुढील पाच वर्षांसाठी विकासाचे धोरण राबविण्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आपल्या ६३ पानांच्या जाहीरनाम्यात मुख्यमंत्री ओम्मन चंडी यांनी आठवीच्या वर्गातील मुलींना मोफत सायकल आणि सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात लॅपटॉप देण्याचे आश्वासनही दिले आहे.
मद्यधोरणाबाबतचा उल्लेखही जाहीरनाम्यात असून पुढील १० वर्षांत राज्यात टप्प्याटप्प्याने मद्यबंदी लागू केली जाईल, असे म्हटले आहे. विकासासाठी सार्वजनिक- खासगी सहभागाला सरकार अनुकूल असल्याचे म्हटले असून यात्रा, आरोग्य, महोत्सव आणि वैद्यकीय पर्यटनाला राज्यात चालना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कृषी क्षेत्राचाही अंतर्भाव करण्यात आला असून रबर उत्पादक शेतकऱ्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे .