भारत-पाकिस्तानदरम्यान खंडित झालेली संवादाची प्रक्रिया रविवारी बँकॉक येथे झालेल्या बैठकीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी प्रामुख्याने दहशतवाद आणि काश्मीर प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
यापूर्वी दोन्हीही देशांनी एकमेकांना काढलेल्या शाब्दिक बोचकाऱ्यांमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची नवी दिल्लीतील नियोजित बैठक रद्द करण्यात आली होती. या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी या वेळी बैठकीकरिता बँकॉकसारख्या त्रयस्थ देशातील स्थळाची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु, भारताचे परराष्ट्र सचिव जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांना भेटण्यासाठी टोकियोमध्ये होते. तर, पाकिस्तानचे परराष्ट्र सचिवदेखील येथे उपस्थित होते. त्यामुळे बैठकीसाठी सोयीचे असल्याने बँकॉकची निवड केली गेली, असे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी सुरक्षा, दहशतवाद, जम्मू-काश्मीर या विषयांसह नियंत्रणरेषेवरील परिस्थितीबाबतही प्रदीर्घ चर्चा केली. यातून, उभय देशांमध्ये भविष्यकाळात भरीव सहकार्याची पायाभरणी व्हावी, अशी आशा या वेळी दोघांनीही व्यक्त केली. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात चर्चा चांगल्या आणि सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे म्हटले आहे. पॅरिस येथे जागतिक हवामान परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात चर्चा झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांना अपेक्षित असलेल्या शांततामय, स्थिर आणि समृद्ध दक्षिण आशियाच्या स्वप्नाकडे पावले टाकण्याच्या दृष्टीने ही बैठक पार पडली, असे या निवेदनात म्हटले आहे. या बैठकीस उभय देशांचे परराष्ट्र सचिवदेखील उपस्थित होते. या भेटीमुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या इस्लामाबाद भेटीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्या पुढील आठवडय़ात एका परिषदेसाठी अफगाणिस्तानला भेट देणार आहेत.
दरम्यान, बँकॉकमध्ये सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीमुळे पॅरिसमधील मोदी-शरीफ भेट ही उत्स्फूर्त नसून पूर्वनियोजित असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील संवादाची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे बोलले जात असून त्याचा तपशील स्वराज यांच्या पाकिस्तान भेटीमध्ये उलगडण्याची शक्यता आहे.