अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील महाभियोग चौकशीत खुली सुनावणी बुधवारपासून सुरू होत असून त्यात डेमोक्रॅट व रिपब्लिकन पक्षातील स्फोटक शक्तिप्रदर्शन बघायला मिळणार आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या पुत्राच्या युक्रे नमधील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणला होता.
प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे दुसऱ्या टप्प्यातील सुनावणी सुरू होत असून ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई झाली तर अशी कारवाई होणारे ते अमेरिकी इतिहासातील तिसरे अध्यक्ष ठरणार आहेत. त्या परिस्थितीत त्यांच्यावर अध्यक्षांच्या कर्तव्यात कसूर करण्याच्या आरोपाखाली सिनेटमध्ये सुनावणी केली जाईल. प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅट पक्षाचे वर्चस्व असून २०१९ च्या अखेरीस महाभियोगाची कारवाई अंतिम टप्प्यात पोहोचू शकते. पण सिनेटमध्ये रिपब्लिकनांचे बहुमत असल्याने ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवून पदावरून काढून टाकणे सोपे नाही.
बुधवारी प्रतिनिधिगृहाच्या गुप्तचर समितीपुढे जाहीर सुनावणी सुरू होईल. यापूर्वी सहा आठवडे बंद दाराआड जाबजबाब झाले होते. आतापर्यंतच्या सुनावणीत ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी कशा प्रकारे युक्रेनवर दबाव आणला याचे पूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.
ट्रम्प यांचे व्यक्तिगत वकील रूडी गिलीयानी यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेन्स्की यांच्यावर दबाव आणून डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार जो बिदेन व त्यांच्या मुलाची चौकशी सुरू करण्यास सांगितले होते. युक्रेनमधील राजदूत विल्यम टेलर व सहायक उप परराष्ट्र मंत्री जॉर्ज केंट यांची साक्ष बुधवारी नोंदवली जाणार असून शुक्रवारी माजी राजदूत मारी योव्हानोविच यांचे जबाब होणार आहेत. या जाहीर सुनावणीतही ट्रम्प यांच्याविरोधात पुरावे गोळा करणे व काही रिपब्लिकनांचा यात पाठिंबा मिळवणे हा हेतू आहे. दोन्ही पक्षांना त्यांच्या साक्षीदारांना समन्स पाठवण्याचा अधिकार असेल, पण गुप्तचर समितीचे प्रमुख अॅडम शिफ हे ज्यांचा ट्रम्प यांच्यावरील आरोपांशी दुरान्वयानेही संबंध नाही अशा रिपब्लिकन साक्षीदारांना रोखू शकतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 1:28 am