ऑगस्ट महिन्यामध्ये काँग्रेस नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे जी-२३ समुहातील काही नेते पुन्हा एकदा जम्मूमध्ये एकाच मंचावर दिसून आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शांति संम्मेलनामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासहीत अनेक बड्या नेत्यांनी पक्षासंदर्भातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. खास गोष्ट म्हणजे याच सर्व नेत्यांनी मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये तत्काळ निर्णय घेण्याची आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याची मागणी केली होती. तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नेते हे नुकतेच राज्यसभेमधून निवृत्त झालेले काँग्रेस खासदार आझाद यांना पक्षाने दिलेल्या वागणुकीवरही नाराज असल्याचे समजते. या संम्मेलनामधील भाषणे आणि नाराजी पाहता जी-२३ मधील नेते पुन्हा एकदा उघडपणे सोनिया आणि राहुल गांधी यांना विरोध करताना दिसत असल्याचे संकेत मिळत आहेत.

जम्मूमध्ये आयोजित शांती संमेलनामध्ये आनंद शर्मा, मनीष तिवारी, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, विवेक तन्खा आणि राज बब्बर यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. आम्ही काँग्रेसचे आहोत की नाही हे आम्हाला कोणी सांगू शकत नाही, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. “जे काँग्रेसमध्ये आहेत ते महात्मा गांधीच्या विचारांचा आदर करतात. अशा लोकांमध्ये खरं बोलण्याची हिंमत नसेल असं कसं होईल,” असा प्रश्न शर्मा यांनी विचारला. “मागील एका दशकामध्ये काँग्रेस कमकुवत झालीय. जसं जसं आमचं वय वाढत जाईल तशी काँग्रेस आणखीन कमकुवत व्हावी असं चित्र दिसून नये असं आम्हाला वाटतं. आमच्यापैकी कोणीही थेट वरुन आलेले नाही किंवा दारं खिडक्यांमधून आलेलं नाही. आम्ही विद्यार्थी आंदोलनामधून पुढे आलो आहोत. आम्ही काँग्रेसी आहोत की नाही हे सांगण्याचा अधिकार आम्ही कोणालाही दिलेला नाही,” अशा शब्दांमध्ये शर्मा यांनी विरोधी विचारसरणीच्या काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्यांना सुनावलं.

या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले नेते गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसने दिलेल्या वागणुकीबद्दल नाराज असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ नेते आणि वकील असणाऱ्या कपिल सिब्बल यांनी, “मला कळत नाहीय की काँग्रेस पक्ष गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवाचा उपयोग का करत नाहीय,” अशा शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त केलीय. अभिनेता ते नेता असा प्रवास केलेले काँग्रेस नेते राज बब्बर यांनी, “लोकं म्हणतात जी-२३. पण मी म्हणेल की गांधी २३ जी-२३ काँग्रेसच्या भल्याचा विचार करत आहे. आझाद यांचा राजकीय प्रवास अजून पूर्ण झालेला नाहीय,” असं मत नोंदवलं.

तर खुद्द आझाद यांनी, “आज अनेक वर्षानंतर मी राज्याचा भाग नाहीय. आपली ओळख संपली आहे. राज्य हा दर्जा परत मिळवण्यासाठी आमचा संसदेबाहेर आणि संसदेमध्ये संघर्ष सुरु राहील. जोपर्यंत येथून निवडून आलेले लोकं मंत्री किंवा मुख्यमंत्री नाही होत तोपर्यंत बेरोजगारी, रस्ते, शाळा यांची हीच परिस्थिती राहणार आहे,” असं म्हटलं. “मी राज्यसभेमधून निवृत्त झालोय, राजकारणामधून नाही. मी संसदेमधून पहिल्यांदाच निवृत्त झालेलो नाही,” असं म्हणत आझाद यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिलेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जी-२३ गटातील एका नेत्याने, “जेव्हा इतर पक्ष आझाद यांच्यासाठी राज्यसभेची जागा देण्याची गोष्टी करत होते. पंतप्रधानांनी त्यांच्याबद्दल एवढ्या चांगल्या गोष्टी बोलले. तर दुसरीकडे आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेृत्वाने त्यांचा सन्मान केला नाही,” अशा शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. अनेक काँग्रेसच्या नेत्यांचा सल्ला फेटाळून लावत पक्षाने मल्लिकार्जुन यांना विरोधीपक्ष नेता म्हणून निवडलं. यासर्वांमुळे जी-२३ गटातील नेत्यांची नाराजी अजून वाढलीय.