06 March 2021

News Flash

जणू बर्लिनची भिंतच पडली!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार

(संग्रहित छायाचित्र)

 

अयोध्येचा निकाल आणि कर्तारपूर कॉरिडोरचे उद्घाटन म्हणजे जणू बर्लिनची भिंतच पडली, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात काढले.

राम मंदिरनिर्माणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन्ही समाजाने स्वीकारला आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना भविष्यातील वाटचाल एकत्रितपणेच करावी लागणार असल्याचेच कर्तारपूर कॉरिडोर सूचित करतो. दोन्ही विचारधारांमधील मतभेद बाजूला करून एकत्र येण्याचा संदेश देणाऱ्या या दोन घटना आहेत, असा विचार मोदी यांनी मांडला.

वाद आणि द्वेष मिटून समाज एक झाल्याचे प्रतीक म्हणजे पूर्व आणि पश्चिम जर्मनी यांना वेगळे करणारी बर्लिनची भिंत कोसळणे. ही भिंत ९ नोव्हेंबर रोजी पाडली गेली त्या ऐतिहासिक घटनेला तीस वर्षे झाली. त्याचा संदर्भ देत, समाजांना एकत्र आणणारे हे दोन निर्णय असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले. शिखांचे धर्मगुरू गुरू नानक यांनी आपल्या आयुष्यातील अखेरची १८ वर्षे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या कर्तारपूरमध्ये घालवली होती. तेथील धर्मस्थळापर्यंत थेट जाण्यासाठी मार्ग शनिवारी खुला झाला. या कॉरिडॉरच्या उद्घाटन समारंभात मोदी तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सहभागी झाले होते. अयोध्येच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपल्याला एकत्रित राहून पुढील वाटचाल करण्याचा संदेश दिला आहे. एकमेकांबद्दल असलेली द्वेषाची भावना मनातून काढून टाकण्याचा हा दिवस आहे. नव्या भारतात भीती, कडवटपणा आणि नकारात्मक विचारांना थारा नाही, असे मोदी म्हणाले. शांतता, एकता आणि ताकद यांच्या एकत्रित सहभागातूनच  विकास घडेल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. भारताच्या इतिहासातील हे सोनेरी पान म्हणावे लागेल. देशातील प्रत्येक समाजाने अयोध्येच्या निकालाचे स्वागत केले आहे. भारताची विविधतेतून एकतेची ताकद यातून स्पष्ट होते. नवे भविष्य घडवण्याचा हाच मंत्र असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा विचार मोदी यांनी बोलून दाखवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 12:57 am

Web Title: opening of the kartarpur corridor is as if the berlin wall fell abn 97
Next Stories
1 आता लक्ष्य फक्त राम मंदिर!
2 Ayodhya verdict : …हे केवळ भारतातच घडू शकतं – मोहम्मद कैफ
3 Ayodhya verdict : न्यायालयाच्या निकालावर लालकृष्ण आडवाणी म्हणाले…
Just Now!
X