हैदराबाद स्फोटांचा तपास अजूनही अंधारात
हैदराबादमधील दिलसुखनगर भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांना चोवीस तास उलटल्यानंतरही त्याच्या सूत्रधारांबाबत धागेदोरे सापडू शकलेले नाहीत. स्फोटांसाठी वापरलेले साहित्य आणि आधीच्या स्फोटांचा अभ्यास केल्यानंतर या स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना असावी, असा कयास बांधण्यात येत आहे.  
हैदराबाद येथे दिलसुखनगर भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या आता १६ झाली असून, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी स्फोटांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या पथकासह विविध सुरक्षा पथकांकडून दिवसभर या स्फोटाचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, घटनास्थळावर मिळालेल्या स्फोटक पदार्थाचे अवशेषांव्यतिरिक्त फारसे काही यंत्रणांच्या हाती लागले नाही. स्फोट घडला त्या भागातील आठही सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आल्याने त्या मार्गाने कोणताही पुरावा मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे.
स्फोट घडवण्यासाठी आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस), अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. इंडियन मुजाहिदीनने स्फोटांसाठी पूर्वी जी पद्धत वापरली होती त्याच्याशी या स्फोटांचे साम्य आहे. त्यामुळे या संघटनेकडे संशयाची सुई वळली आहे. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सईद मकबूल व इम्रान खान या इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांची त्यासाठी चौकशी करण्यात येत आहे. मूळचे नांदेडचे असलेल्या या दोघांनीही चौकशीदरम्यान हैदराबादमध्ये स्फोट घडवण्याचा कट असल्याचे सांगितले होते.
‘इशाऱ्या’वरून दोषारोप
स्फोटाच्या दिवशी, गुरुवारी सकाळी हैदराबाद पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती, असा दावा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मात्र, ‘या सूचना नियमित स्वरूपाच्या होत्या’ असे सांगून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे या मुद्यावर आरोप प्रत्यारोपांचे राजकारण पुन्हा रंगू लागले आहे.