कर्नाटकातीत भाजपची मोहीम तुर्तास स्थगित

कर्नाटकमधील ऑपरेशन लोटस ही मोहीम भाजपने तूर्त स्थगित केल्याचे वृत्त आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस-जेडीएस सरकारवर टीका करून त्याचा लाभ पदरात पाडून घ्यावयाचा आणि त्यानंतर ऑपरेशन लोटस कारवाई सुरू करावयाची, असे भाजपने ठरविल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यातील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार उलथून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या पक्षाचा एकही सदस्य सहभागी नसल्याचा दावा प्रदेश भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडी आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. सत्तारूढ आघाडीचे आमदार मुंबईत असून त्यांच्याशी भाजपला काहीही देणे-घेणे नाही, काँग्रेस आणि जेडीएस आघाडी स्वत:ची असमर्थता झाकण्यासाठी भाजपला दूषणे देत आहेत, असेही येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. आमच्याकडून सत्तास्थापनेसाठी कोणतेही प्रयत्न सुरू नाहीत, मात्र राज्यातील आघाडीचे सरकार कायम राहील ही आमची जबाबदारी नाही, सत्ताधारी पक्षातील  आमदारांनी उघडपणे बंड केल्यास पुढील विचार केला जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

‘भाजपचे आमदार हॉटेलमध्ये कैद’

आपले सरकार अस्थिर करण्याचे व्यर्थ प्रयत्न करणाऱ्या भाजपने आपल्या (भाजपच्या) आमदारांना गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये बंदी बनवून ठेवल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी केला. याउलट राज्यातील सत्तारूढ काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार मुक्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कर्नाटकात भाजप हा पाठिंब्यासाठी काँग्रेस आमदारांना आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या वृत्ताने कुमारस्वामी सरकार राजकीय वादळात सापडले आहे. कुमारस्वामी हेच भाजपचे आमदार फोडण्याच्या तयारीत होते, असा आरोप भाजपने केला आहे. कुमारस्वामी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले की, ‘१५ जानेवारीला काही तरी क्रांती घडून येईल, असा समज पसरवण्यासाठी काही लोकांनी तुम्हा पत्रकारांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण मला वाटते क्रांती करण्याऐवजी त्यांनी स्वत:साठी भ्रांती (काळजी) तयार केली!’

काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे  नेते, विशेषत: कुमारस्वामी हे भाजप आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजप नेते यदियुरप्पा यांनी केला आहे. त्याचे आपणास आश्चर्य वाटत आहे, अशी टिप्पणी कुमारस्वामी यांनी केली.

विरोधकांचा महामेळावा भाजपसाठी मृत्युघंटा – ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसने १९ जानेवारी रोजी येथे आयोजित केलेला विरोधी पक्षांचा महामेळावा ही लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपसाठी मृत्युघंटा ठरेल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले असून प्रादेशिक पक्षच निर्णायक भूमिका बजावतील, असे स्पष्ट केले आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १२५ हून अधिक जागा मिळणार नाहीत.

राज्यातील पक्ष भाजपहून अधिक जागा जिंकतील आणि निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांची भूमिकाच निर्णायक ठरेल, असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.