येत्या काही आठवड्यांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगना आणि मिझोराम येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये कोणाचे सरकार येईल याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. कारण येथे सध्या भाजपाचे सरकार आहे. आजवर झालेल्या अनेक सर्वेक्षणातून राजस्थानात भाजपाची स्थिती वाईट असल्याचे बोलले जात आहे. तर मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येईल असे सांगण्यात येत आहे. राजस्थानात भाजपाला ८४ जागा तर काँग्रेसला ११० जागा मिळण्याचा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिनही भाजपा शासित राज्यांमधील लोकांचा कल महत्वाचा ठरणार आहे.

मध्य प्रदेशात एकूण २३० जागा आहेत. एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार, भाजपाला येथे ११६ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला १०६ जागा मिळू शकतात. तर इतर पक्षांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तर भाजपाला येथे ४१ टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला ४० टक्के आणि अन्य पक्षांना १९ टक्के जागा मिळू शकतात. भाजपा येथे चौथ्यांदा सरकार स्थापन करु शकते. काँग्रेसचाही प्रचार येथे चांगला होत आहे. मात्र, स्वतःच्या हिंमतीवर ते सरकार स्थापन करु शकतील इतका तो चांगला नसल्याचे एबीपीच्या सर्वेमधून सांगण्यात येत आहे.

त्याचबरोबर एबीपी न्यूजच्या सर्वेनुसार, छत्तीसगढमध्ये भाजपाला ४३ टक्के मतं मिळू शकतात. तर काँग्रेसला ३६ टक्के आणि अन्य पक्षांना २१ टक्के मतं मिळू शकतात. छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्यांपैकी भाजपाला ५१, काँग्रेसला २५ तर इतर पक्षांना ९ जागांवर समाधान मानावे लागू शकते.

राजस्थानात मतदानाच्या टक्केवारीनुसार विचार केल्यास भाजपाला ४१ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या खात्यात ४५ टक्के मतं पडू शकतात. तर अन्य पक्षांना १४ टक्के मतं मिळू शकतात. जागांचा विचार केल्यास राजस्थानात भाजपाला ८४ जागा, काँग्रेसला ११० जागा आणि इतर पक्षांना ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे.