उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पक्षात सुरु असलेल्या परिवार वादात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वडील आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनाही मागे टाकले आहेत. पक्षाचे जवळपास ९० टक्के आमदार अखिलेश यांच्यासोबत आहेत. त्याचदरम्यान एबीपी न्यूज-लोकनिती सीएसडीएस यांनी केलेल्या ताज्या सर्व्हेनुसार, अखिलेश यादव हे कार्यकर्त्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आहेत.

सर्व्हेनुसार, अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी समाजवादी पक्षाच्या ८३ टक्के मतदारांची इच्छा आहे. केवळ ६ टक्के मतदारांना मुलायमसिंहांनी मुख्यमंत्री व्हावे, असे म्हटले आहे. तर दोन टक्के मतदारांचे रामगोपाल यादव यांना समर्थन आहे. सध्या सुरु असलेल्या वादात मुलायमसिंहांनी मुख्यमंत्री व्हावे का, या प्रश्नावर ३३ टक्के मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. पण ३७ टक्के मतदारांनी मुख्यमंत्रिपदी अखिलेशच राहावेत, असे म्हटले आहे. तर २५ टक्के मतदारांनी समाजवादी पक्षातील भांडणाला शिवपाल जबाबदार आहेत, असे म्हटले आहे. तर अखिलेश हे या वादाला कारणीभूत आहेत, असे केवळ ६ टक्के मतदारांना वाटते.

अखिलेश यादव हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार आहेत, त्यांनाच मतदारांनी पहिली पसंती दिली आहे. अखिलेश हेच मुख्यमंत्री व्हावेत, असे २८ टक्के मतदारांचे म्हणणे आहे. तर मायावती यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे २१ टक्के लोकांना वाटते. तर मुलायमसिंह यांना केवळ ३ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे. अखिलेश यादव यांच्या सरकारने मायावती सरकारपेक्षा चांगले काम केले आहे, असे ४१ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर ३४ टक्के मतदार अखिलेश यादव यांच्या कारभाराने समाधानी आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगली कामे केली आहेत, असे ३२ टक्के लोकांचे म्हणणे आहे. सर्व्हेनुसार, ५४ टक्के मुस्लिम समाजवादी पक्षासोबत आहेत. तर १४ टक्के मुस्लिमांनी बसपला पसंती दिली आहे. ९ टक्के मुस्लिमांनी भाजपला तर ७ टक्के मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. यादवांचाही समाजवादी पक्षालाच पाठिंबा आहे. ७५ टक्के यादव सप, ४ टक्के बसप, तर १४ टक्के यादव मतदार भाजपसोबत आहेत. सवर्णांनी मात्र, भाजपला पाठिंबा दिला आहे. ५५ टक्के सवर्ण भाजपच्या बाजुने आहेत. समाजवादी पक्षाला केवळ १२ टक्के सवर्णांचाच पाठिंबा आहे. बसपला ८ टक्के तर काँग्रेससोबत केवळ १० टक्के सवर्ण आहेत.

ओबीसी मतदारांचाही भाजपला पाठिंबा आहे. ३४ टक्के मतदार भाजपच्या बाजुने आहेत. २३ टक्के ओबीसींचा समाजवादी पक्षाला पाठिंबा आहे. तर २० टक्के ओबीसींची बसपला पसंती आहे. काँग्रेसला केवळ १० टक्के ओबीसी मतदारांनी पाठिंबा दिला आहे.