तामिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष द्रमूक आणि आणि काही मुस्लीम संघटनांच्या विरोधानंतरही विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) रामराज्य रथयात्रेने मंगळवारी तामिळनाडूत प्रवेश केला. या यात्रेमुळे राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेल आणि शांततेला धोका निर्माण होईल, अशी भीती द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी विधानसभेत व्यक्त केली.

स्टॅलिन आणि द्रमुकच्या आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली आणि सभात्याग केला. त्यानंतर बाहेर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या स्टॅलिन आणि इतर आमदारांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, दि. १३ फेब्रुवारीपासून अयोध्यातून निघालेल्या या यात्रेतील पहिला टप्पा दि. २५ मार्च रोजी कन्याकुमारी येथे संपणार आहे. त्यानंतर ही यात्रा कन्याकुमारहून काश्मीरला रवाना होईल.

याचदरम्यान काही लोकांकडून होत असलेल्या विरोध करण्याच्या इशाऱ्यामुळे तिरुनेल्वेली येथे दि. २३ मार्चपर्यंत कलम १४४ जारी करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अरूण शक्तीकुमार म्हणाले की, कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. रथयात्रेला प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल.

आतापर्यंत ४४ आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्यात यावे आणि रथयात्रा रोखावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.