राष्ट्रीय असेंब्लीच्या एनए-२५० या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ४३ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याच्या निर्णयास मुत्ताहिदा कौमी मूव्हमेन्ट (एमक्यूएम) पक्षाने बुधवारी जोरदार विरोध दर्शविला.
या मतदारसंघात मतदान केंद्रे बळकाविण्यात आल्याच्या तक्रारीवरून मतदान रद्द केले गेले होते. पाकिस्तान निवडणूक आयोगाने आता तेथे रविवारी फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे. एमक्यूएम पक्षाचे नेते मुस्तफा कमाल यांनी दूरचित्रवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत या निर्णयास तीव्र आक्षेप घेतला.
निवडणूक आयोगाच्या कुचराईमुळेच काही मतदान केंद्रांवर गदारोळ झाला होता. अनेक केंद्रांवर तयारीअभावी मतदान उशीरा सुरू झाले होते तर काही ठिकाणी ते घेताच आले नाही. आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी ते पुन्हा मतदान घेणार असतील तर आमचा त्याला विरोध आहे, असे कमाल म्हणाले.
ओबामांकडून अभिनंदन
पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नवाज शरीफ यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
अध्यक्षीय प्रासाद ‘व्हाइट हाऊस’चे प्रसिद्धी माध्यम सचिव जे कार्ने यांनी ही माहिती दिली.