शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, मंगळवारी दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी विधीमंडळाबाहेर फलक हातात घेऊन निदर्शने केली. विधानसभेमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी सुरूच ठेवली. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करावी आणि त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी विरोधकांनी केली. आम्हाला चर्चा नकोय, सरकारकडून घोषणा हवी आहे, अशी स्पष्ट मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचे कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले होते.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासूनच आपल्या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक रूप घेतले. विधीमंडळाबाहेरच सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना पॅकेज दिलेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासोबत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
विधीमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यात कापूस, धान, संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. नापिकीची स्थिती आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करताहेत. तरीही सरकार काहीही निर्णय घेत नाही. अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहणार आहे. शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफी केलीच पाहिजे. त्यांना आर्थिक पॅकेज दिलेच पाहिजे. ते देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत.