सीबीआयच्या अतंर्गत वादावर विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अंतर्गत युद्ध चव्हाटय़ावर आल्यानंतर, सोमवारी विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य बनवले. मोदी ‘सीबीआय’चा वापर ‘राजकीय हत्यार’ म्हणून करत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असतानाही स्वत:च्या मर्जीतील अधिकाऱ्याची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती करून पंतप्रधानांनी ‘सीबीआय’च्या विश्वासार्हतेला तडा दिला असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये राहुल अस्थाना यांची विशेष संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ते ‘सीबीआय’मध्ये ‘क्रमांक-२’चे अधिकारी आहेत.

मटण निर्यातदार मोईन कुरेशी यांच्याविरोधातील चौकशी प्रकरणात अस्थाना यांनी दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा सीबीआयने दाखल केला. कोटय़वधीच्या अफरातफरीच्या प्रकरणात कुरेशीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी स्वत: अस्थाना करत आहेत, मात्र त्यांनी संचालक अलोक वर्मा यांनी कुरेशीकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोप-प्रत्यारोपाचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाल्यामुळे ‘सीबीआय’मधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.

वास्तविक वर्मा यांचा अस्थाना यांच्या विशेष संचालकपदी कार्यरत राहण्याला विरोध आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये संचालक झाल्यानंतर वर्मा यांनी ऑक्टोबरमध्ये केंद्रीय दक्षता आयोगाला आक्षेप घेणारे पत्र पाठवले होते.

गुजरातमधील ‘स्टर्लिन बायोटेक’ कंपनीकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा अस्थानांवर आरोप ठेवला होता. आरोप असलेल्या अधिकाऱ्याला ‘सीबीआय’च्या बैठकांना अस्थाना यांच्या उपस्थितीवरही वर्मा यांनी आक्षेप घेतला होता. त्याविरोधात अस्थाना यांनी केंद्रीय सचिवांकडे वर्मा यांची तक्रार केली होती.

अस्थाना हे मोदी यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. ते गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी असून ‘गोध्रा कांड’ प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीची जबाबदारी (एसआयटी) अस्थाना यांच्याकडे होती.

‘एसआयटी’ने या प्रकरणात मोदींना ‘क्लीन चिट’ होती. सध्या अस्थाना यांच्याकडे अनेक अत्यंत महत्त्वाच्या भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांच्या चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय मल्या, मेहुल चौक्सी, मोइन कुरेशी, लालू प्रसाद यादव यांच्याशी निगडित आर्थिक गुन्ह्य़ांची अस्थाना चौकशी करत आहेत. ही सर्व प्रकरणे वादग्रस्त ठरली असून मोदी सरकारच्या वरदहस्तामुळेच मल्ल्या, चोक्सी यांनी देशाबाहेर पलायन केल्याचा आरोप केला गेला आहे.

सीबीआयच्या संचालकपदावरून अनिल सिन्हा निवृत्त झाल्यानंतर अस्थाना यांच्याकडे संचालकपदाची हंगामी जबाबदारी देण्यात आली होती. त्याला ज्येष्ठ  वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘स्टर्लिग बायोटेक’मध्ये प्राप्तिकर खात्याने छापे टाकून डायरी जप्त केली होती. त्यात अस्थाना यांचे नाव आले असतानाही सीबीआयचे ‘क्रमांक-२’चे अधिकारी म्हणून नियुक्ती कशी होऊ शकते, असा सवाल योगेंद्र यादव यांच्या ‘स्वराज इंडिया’ पक्षाने केला आहे.