नरेंद्र मोदी सरकारविरोधात उद्या (१६ मार्च) लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्ष शुक्रवारी एनडीए सरकारविरोधात हा अविश्वास ठराव आणणार आहे. वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी याबाबत पत्र लिहून अनेक विरोधी पक्षांकडे पाठींब्याची मागणी केली आहे.


यासंदर्भात वायएसआर काँग्रेसचे खासदार वाय. वी. सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा महासचिवांना निवेदन दिले आहे. तसेच या मुद्द्याला उद्या सभागृहात कार्यवाहीसाठी समाविष्ट करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सुब्बा रेड्डी यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आणि पाठींबा देण्याची मागणी केली.


त्याचबरोबर, दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील गरज पडल्यास या अविश्वास ठरावाला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे. नायडू यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले की, ‘जर गरज पडली तर आम्ही सरकारविरोधात अविश्वास ठरावाला पाठींबा देऊ, मग हा प्रस्ताव कोणीही आणला तरी चालेल.’ विशेष म्हणजे आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही एकमेकांचे विरोधी पक्ष आहेत.