उद्यापासून (बुधवार) सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सोमवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झालेले सर्व पक्ष अविश्वास प्रस्ताव आणण्याबाबत सहमत झाले आहेत. सर्वच विरोधी पक्ष एकत्र यावेत यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही खर्गे यांनी सांगितले. या अधिवेशनात काँग्रेस महिला सुरक्षा, बेरोजगारी, जमावाकडून होत असलेल्या हत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार विरोध कायदा, महागाई, पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या पैशांमध्ये ५० टक्क्यांनी झालेली वाढ आदी मुद्यांवर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अविश्वास प्रस्तावात हे सर्व मुद्दे समाविष्ट केले जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा प्रामुख्याने उठवला जाणार आहे. जनतेच्या समस्या सदनात उपस्थित करण्याची आम्हाला संधी मिळेल, अशी आशा आम्ही करतो, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्ष सभागृहाचे कामकाज चालू देत नाही, असे सातत्याने म्हटले जाते. पंतप्रधान आणि त्यांचे लोक सातत्याने याबाबत बोलत असतात. जेव्हा आम्ही महत्वपूर्ण मुद्दे समोर मांडतो तेव्हा यापासून पळ काढण्यासाठी सरकारकडून नवनवीन पद्धती शोधल्या जातात. आम्हाला सभागृहाचे कामकाज सुरू ठेवायचे असून जनतेचे सर्व प्रश्न उपस्थित करायचे आहेत. जनतेच्या हिताचे आणि महत्वाचे प्रश्न सर्वांनी संयुक्तरित्या उपस्थित करण्यावर बैठकीत सर्व विरोधी पक्षांचे एकमत झाले.

हे सरकार सर्वच ठिकाणी अपयशी ठरले आहे. जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही. जमावाकडून हत्यासारख्या घटना घडतात. विशेष म्हणजे मंत्री त्याचे समर्थनही करतात. हा मुद्दा आम्ही सभागृहात ठेवू इच्छितो. रोजगाराचाही महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही त्यांना किती रोजगार उत्पन्न झाले आणि किती लोकांना रोजगार मिळाला हे विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले.