अन्नसुरक्षा विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी अध्यादेशाचा मार्ग स्वीकारून सरकारने संसदेचा अवमान केला असल्याची टीका डाव्या पक्षांनी केली. तर हे निवडणुकीसाठी खेळलेले षड्यंत्र असून या महत्त्वपूर्ण मुद्दय़ावरून पळ काढण्यासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय जाहीर करून काँग्रेसने संसदेपासून पळ काढण्याचा मार्ग स्वीकारला आहे, असा आरोप भाजपने केला.
अध्यादेश जारी करण्याचे हे पाऊल पूर्णपणे अनावश्यक असून या महत्त्वपूर्ण विधेयकावर संसदेत दीर्घ चर्चा करून ते संमत करण्याऐवजी सरकारने संसदेचा अवमानच केला आहे, या शब्दांत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी या निर्णयावर झोड उठविली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी सरकारच्या या खेळीला विरोध करीत सरकार या विधेयकासंबंधी खरोखरच गंभीर आणि प्रामाणिक असते तर त्यांनी पावसाळी अधिवेशन आधीच बोलवायला हवे होते, असे मत मांडले. यूपीए सरकारने आपल्या दुसऱ्या कारकिर्दीत केलेल्या खेळी ओळखण्यात लोक पुरेसे प्रगल्भ झाले आहेत, असा इशारा राजा यांनी दिला.
या विधेयकावर संसदेतील चर्चेपासून सरकार पळ काढत असल्याची टीका भाजपने केली आहे. या विधेयकावर चर्चा घडवून आणण्यात आली असती तर या विधेयकामधील अनेक त्रुटींवर विविध राजकीय पक्षांनी बोट ठेवले असते. त्यामुळे या विषयावर पुरेशी तयारी न करताच अध्यादेशाचा मार्ग अनुसरण्यात आला, असा आरोप भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन् यांनी केला.