केंद्रीय गुप्तचर संस्थांनी बोधगयामधील महाबोधी मंदिराच्या परिसरातील हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती,या दाव्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनी केंद्र व राज्य सरकार यांना सुरक्षा उपाययोजना न केल्याबद्दल धारेवर धरले.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, केंद्रीय संस्थांनी हल्ल्याची पूर्वसूचना देऊनही राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था केली नाही ही गंभीर बाब आहे. केंद्र सरकारनेही अशा हल्ल्यांची जबाबदारी घेतली पाहिजे.
काँग्रसचे सरचिटणीस अजय माकन यांनी सांगितले की, बोधगयातील या भयानक हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो.राज्य सरकारने व इतर संस्थांनी यात दोषी व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत.
बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाबोधी मंदिरातील हल्ल्याचा निषेध केला आहे. केंद्र व राज्य सरकार हे दोघेही याला जबाबदार असून बौद्ध धार्मिकस्थळास सुरक्षा देण्यात यावी. गुप्तचरांनी सूचना देऊनही हा हल्ला टाळला नाही, किंबहुना पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली.दहशतवादी हल्ल्यावर राजकारण न करता केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्र बसून या मंदिराच्या परिसरात पुरेशी सुरक्षा द्यावी, असेही ते म्हणाले.
लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पास्वान यांनी सांगितले की, हल्ला टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाही हे राज्य सरकारचे अपयश आहे. हल्ल्याची पूर्वसूचना असतानाही हे घडत असेल तर ती जबाबदारी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची आहे. या हल्ल्याने बिहारची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली आहे.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, गुप्तचर खात्याने हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती, त्यामुळे जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल.श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी या हल्ल्याच्या वृत्तानंतर नाराजी व्यक्त केली व आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले.
बिहारमधील बोधगया मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर भारत-नेपाळ सीमेवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.