राज्यात भाजपला माघार घ्यावी लागल्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची घमेंड मोडल्याचा सूर विरोधी पक्षनेत्यांमधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात लपूनछपून शपथविधी उरकण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मंगळवारी विरोधी पक्षांनी संसदेच्या आवारात आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी आपापसातील चर्चेमध्ये भाजपच्या नेतृत्वाबद्दलच्या भावनांना वाट करून दिली.

संसदेत संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचा आरोप मोदी सरकारवर करत विरोधकांनी संसदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुकळ्यासमोर निदर्शने केली. काँग्रेसच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचेही खासदार सहभागी झाले होते.

तासभर झालेल्या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी स्वत: फलक घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या बरोबरीने ८७ वर्षांचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही होते. या आंदोलनात तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आदी विरोधी पक्ष सहभागी झाले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. आंदोलन संपता संपता शिवसेनेच्या खासदारांनी सोनियांना अभिवादन केले. सोनियांनी शिवसेनेच्या खासदारांना तितक्याच आत्मियतेने प्रतिसाद दिला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या आठवडय़ात सत्ताधारी बाकांवर शांतता आणि सदस्यांची अनुपस्थिती दिसत होती, तर विरोधक पहिल्यांदाच आक्रमक झाले होते. सोमवारीही लोकसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या मोकळ्या जागेसमोर येऊन घोषणाबाजी केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलना पाचारण केले. बिर्ला यांच्या या कृती अनावश्यक असल्याचे मत भाजपच्या नेत्याने व्यक्त केले. लोकसभेतील सदस्यांविरोधात मार्शलचा वापर करणे योग्य नव्हते. अध्यक्षांनी दहा-दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करणे उचित ठरले असते, असे मत या नेत्याने मांडले.