राजस्थान विधानसभेतील उप विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यास उर्वरित कालावधीसाठी बंदी घालण्यात आली आहे. राठोड यांनी विधानसभेचे अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्याशी वाद घातला होता.

राठोड यांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ न देण्याचा प्रस्ताव विधिमंडळ कामकाजमंत्री शांती धारीवाल यांनी मांडला. तो आवाजी मतदानाने संमत करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनीच धारीवाल यांना राठोड यांच्या विरोधात प्रस्ताव मांडण्यास सांगितले होते.

राठोड यांनी असा आरोप केला, की विरोधी पक्षाच्या सदस्यांना विधेयकांवर बोलण्यास पुरेसा वेळ दिला जात नाही. त्यावर विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याशी त्यांनी वाद घातला. परिणामी सभागृहात भाजपचे सदस्य घोषणा देत अध्यक्षांच्या समोरील जागेत जमले. या गोंधळामुळे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले.  नंतर विरोधी भाजप सदस्यांनी सभात्याग केला. विधानसभेचे अधिवेशन पुढील सोमवारी संपणार आहे.

बसप आमदारांच्या काँग्रेस विलीनीकरणाविरोधात याचिका निकाली

नवी दिल्ली : राजस्थानात बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना याचिकेची गुणवत्ता बघून निर्णय घेण्याचा आदेश जारी केल्याने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही याचिका आता संदर्भहीन किंवा निरुपयोगी आहे त्यामुळे ती विचारात घेता येणार नाही असे स्पष्ट करीत न्या. अरुण मिश्रा, न्या. विनीत सरण, न्या. एम.आर. शहा यांनी सांगितले की, भाजपचे आमदार मदन दिलावर यांनी राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती आम्हाला काँग्रेसचे वकील कपील सिब्बल यांनी दिली आहे.