राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी आज विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली.  या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  माजिद मेमन यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. जवळपास अडीचतास चाललेल्या या बैठकीत साधारणपणे १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांचा या समावेश होता.

पत्रकारपरिषदेत बोलताना माजिद मेमन म्हणाले, आजच्या बैठकीत विशेष करून, राष्ट्रीयमंचची जी विचारसरणी आहे व जो कार्यक्रम आहे. त्या अंतर्गत असं अशी चर्चा झाली की आज जे देशात जे राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण  बनलं आहे,  त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी  राष्ट्रमंचाची  काय भूमिका असेल. यावर सर्वांचे मत घेण्यात आलं आहे. यामध्ये काही अराजकीय व्यक्ती देखील सहभागी होते.  जावेद अख्तर, न्यायमूर्ती एपी शहा यांनी देखील आपलं मत मांडलं.  म्हणून हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ज्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं उचित ठरणार नाही.

सुरूवातील माजिद मेमन यानी सांगितलं,   याबाबत खुलासा करणं अतिशय आवश्यक आहे, कारण माध्यमांमध्ये मागील २४ तासांपासून ज्या बातम्या सुरू आहेत की, ही राष्ट्रमंचची बैठक भाजपा विरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी बोलावली आहे. मात्र असं काहीच नाही. सर्वात अगोदर तर मी हे सांगू इच्छितो की, ही बैठक शरद पवारांच्या घरी झाली आहे. मात्र ही बैठक शरद पवार यांनी बोलावली नव्हती. ही बैठक राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती व आम्ही सर्व जे राष्ट्रमंचाचे सदस्य आहोत, आम्ही सर्वांनी मिळून या बैठकीचे आयोजन केले होते.

तसेच, अशा देखील चर्चा सुरू आहेत की शरद पवारांच्या माध्यमातून हे एक मोठं राजकीय पाऊल उचललं जात आहे व ज्यामध्ये काँग्रेसला वेगळं पाडण्यात आलं आहे, मात्र ही माहिती देखील चुकीची आहे. राजकीयदृष्ट्या अशी कोणतीही मोठी घडामोड झालेली नाही. आम्ही त्या सदस्यांना बोलावलं होतं की जे आमच्या राष्ट्रमंचाच्या विचारसरणीशी सहमत आहेत. यामध्ये सर्व राजकीय पक्षातील लोक येऊ शकतात, यामध्ये कोणताही राजकीय मतभेद नव्हता. असं मेमन म्हणाले.

याचबरोबर, काँग्रेसच्या सदस्यांना देखील मी स्वतः निमंत्रण दिले होते. ज्यामध्ये मनिष तिवारी, कपिल सिब्बल, डॉ. अभिषेक मनुसिंघवी, शत्रुघ्न सिंन्हा यांचा समावेश आहे. पण काहीजणांची खरोखरच अडचण होती, ज्यामुळे ते येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी हे देखील सांगितले की आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे ही काही काँग्रेसला वेगळं पाडण्यासाठी मोठी आघाडी  तयार होत आहे, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. असं माजिद मेमन यांनी स्पष्ट केलं.