भारत बंददरम्यान झालेल्या अहिंसेला विरोधक जबाबदार असल्याची टीका भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. अमित शाह यांनी विरोधकांवर टीका करताना बंददरम्यान झालेल्या १० मृत्यूंसाठी विरोधकच जबाबदार असल्याचंही म्हटलं आहे. ‘आम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याचं जाहीर केलं असतानाही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारण्याची काय गरज होती ? आंदोलनादरम्यान झालेल्या १० मृत्यूंसाठी विरोधकच जबाबदार आहेत’, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. ओडिशामधील भवानीपाटणा येथील सभेत ते बोलत होते.

दलित आणि आदिवासी अत्याचारविरोधी कायद्यावरुन (अॅट्रॉसिटी) राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात तीव्र आंदोलनं झाली. दलित संघटनांच्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. राजस्थानमध्ये तर संतप्त सवर्णांच्या गटाने भाजपाच्या दलित समाजाच्या आमदार आणि काँग्रेसच्या माजी आमदाराची घरे जाळली. बंददरम्यान एकूण १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

देशातील अल्पसंख्यांकाना आमचं समर्थन आहे सांगताना अमित शाह मोदी सरकार आरक्षण हटवू पाहत असल्याची अफवा पसरवली जात असल्याचं म्हटलं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतून मांडलेल्या तत्वांशी आम्ही एकनिष्ट आहोत असं त्यांनी सांगितलं. भाजपा सरकार आरक्षण हटवणार नाही आणि कोणाला हटवूही देणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

‘आमचा आपल्या राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. आरक्षण धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही. तो बदल करण्याची कोणी हिंमतही करु शकत नाही. भाजपा कोणालाही आरक्षण धोरण बदलण्याची परवानगी देणार नाही’, असं अमित शहा बोलले आहेत.

याआधी पंतप्रधान नरेंद्र यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरुन फक्त राजकारण केल्याचा आरोप केला. सोबतच आमच्या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचा जितका सन्मान केला तितका कोणत्याच सरकारने केला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.