News Flash

मशिदीच्या पायाभरणीच्या वक्तव्यावरून विरोधकांचा योगींवर निशाणा; म्हणाले…

मशिदीच्या पायाभरणीला जाणार नसल्याचं केलं होतं वक्तव्य

(Photo: PTI)

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर योगी आदित्यनाथ यांनी अन्य मुद्द्यांवरही मोकळेपणानं चर्चा केली. यावेळी मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. “या कार्यक्रमासाठी मला कोणी बोलावणारही नाही आणि मी जाणारही नाही. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळं लागेल,” असं उत्तर त्यांनी या प्रश्नाला दिलं. यावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.

“या प्रकारचं वक्तव्य करून योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदासाठी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे. ते केवळ हिंदूंचे नाही तर संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यात हिंदू आणि मुस्लिमांची जेवढीही लोकसंख्या असेल तेवढ्या लोकसंख्येचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते पवन पांडेय यांनी केली.

“योगी आदित्यनाथ यांनी मशिदीच्या केलेल्या वक्तव्यावर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. राजीव गांधी हे अयोध्येला गेले होते आणि त्यांनी राम मंदिराचं टाळं उघडलं हे मुख्यमंत्र्यांना माहित हवं. ते हिदुत्वाचं राजकारण करत आहेत आणि काँग्रेस कायम लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. परंतु ते केवळ भाजपाचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत आहे आणि तो त्यांचा गैरसमज आहे,” असं मत काँग्रेसचे माध्यम संयोजक लल्लन कुमार यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार का?; योगी आदित्यनाथ म्हणतात…

काय म्हणाले होते योगी?

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सर्वधर्मियांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि ते कार्यक्रमातही सहभागी झाले, यासंदर्भातही त्यांना सवाल करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी आपण मशिदीच्या कार्यक्रमासाठी जाणार नसल्याचं म्हटलं. “माझं जे काही काम आहे ते मी करणार. बाकी मला त्या ठिकाणी ना बोलावण्यात येईल ना मी जाणार. जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळी लागतील,” असंही ते म्हणाले. आजतकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “हा माझ्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि भावनिक क्षण होता. मझ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्य समजतो. माझ्या गुरू परंपरेनं हा संकल्प अनेक दशकांपूर्वी पाहिलेला. तो आता साकार झाला आहे. मंचावर असलेले लोकं राम जन्मभूमीसोबत आत्मियतेनं जोडले गेलेले आहेत. हा आमच्यासाठी नक्कीच उत्साहाचा दिवस होता,” असंही योगी आदित्यनाथ बोलताना म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:02 am

Web Title: opposition parties criticize uttar pradesh cm yogi adityanath masjid statement ram mandir ayodhya jud 87
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 २४ तासांत ६१,५६७ नवे करोनाबाधित, ९३३ जणांचा मृत्यू
2 सुशांत सिंह मृत्यू प्रकरण : वर्षभरात रियाने महेश भट्ट यांना तब्बल इतक्या वेळा केला फोन
3 केरळ विमान अपघात : राफेलची जबाबदारी असलेल्या स्क्वॉड्रनमध्ये कार्यरत होते कॅप्टन दीपक साठे
Just Now!
X