देशभरात उसळलेल्या हिंसाचारावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. आज सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी यांनी ही मागणी केली आहे. एवढंच नाही तर जमिया प्रकरणी जी कारवाई केली ती चुकीची आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. ईशान्य भारत आणि दिल्ली या ठिकाणची स्थिती चिंताजनक असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

सुधारित नागरिकत्त्व कायदा हा तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांनी केली आहे. या कायद्यामुळे देशात हिंसाचार सुरु आहे. देश एकसंध ठेवायचा असेल तर हा कायदा मागे घेणेच हिताचे ठरेल अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे करण्यात आली आहे.