कोणतीही किंमत मोजून सत्ता हस्तगत करायचीच, असा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एकदिवसीय उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी सूरजकुंड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहा, अशी सूचना यावेळी केली.
कॉंग्रेसच्या या बैठकीला सोनिया गांधींसह, पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि केंद्रीय राज्य मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रातील संयुक्त लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा असणाऱ्या सोनिया गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गेल्या आठ वर्षांच्या काळात केंद्र सरकारने चांगले काम केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून हीच कटिबद्धता आपला धर्म आहे. त्यामुळे चांगले काम केले असले तरी सध्या आपण अतिशय कठीण आव्हानांना सामोरे जात असल्याचेही सोनिया गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारने जागतिक आर्थिक मंदीच्या तडाख्यातही देशाच्या अर्थव्यवस्थेला समाधानकारक सावरण्याचा प्रयत्न केला.